नाशिक : घरी पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच केली चोरी, साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास

दागिने चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरी पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच घरात चोरी करून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यात एका तरुणीचा समावेश आहे.

योगिता घनश्याम यशवतंराव (रा. वावरेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. १) रात्री त्यांच्या घरी प्रियंका कैलास पवार (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड), तेजस रावसाहेब पगारे (रा. एबीबी सर्कल) व विशाल एकनाथ घन (रा. सावतानगर, सिडको) हे तिघे आले होते. पार्टी सुरू असताना योगिता या तेजस सोबत दोन वेळा घराबाहेर गेल्या होत्या. तसेच ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. शुक्रवारी सकाळी संशयित घरातून गेले होते. त्यानंतर शनिवारी (दि. ३) योगिता या गळ्यातील सोन्याची चेन घालण्यासाठी घरातील कपाट उघडले. मात्र, कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पार्टीसाठी आलेल्या तिन्ही मित्रांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे योगिता यांनी मुंबईनाका पोलिसांकडे धाव घेत तिघांनी घरातील सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे.

त्यानुसार तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी योगिता यांच्या घरातून सुमारे वीस तोळे वजनाचे दागिने त्यात दोन लाख ७१ हजारांच्या सोनसाखळ्या, एक लाख १३ हजार ८२५ रुपयांच्या ८ अंगठ्या, ३६ हजार रुपयांची कर्णफुले, ७५ हजारांचे ब्रेसलेट, साडेसात हजारांचे कानातले दागिने आणि साठ हजार रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घरी पार्टीसाठी आलेल्या मित्रांनीच केली चोरी, साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.