नाशिक : चांगली त्वचा अन् दृष्टीसाठी केसांना रंग टाळा

hair color www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

केसांना कलर करणे कधी हौस म्हणून, तर कधी गरज म्हणून केली जाते. कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढल्याने पांढरे केस लपवण्यासाठी केसांना कलर केला जातो. परंतु त्याचा त्वचेवर व दृष्टीवर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बाजारात अनेक हेयर डाय कंपन्या आहेत. कंपनी अमोनिया फ्री कलरचा दावा करत असली तरी अमोनियाशिवाय केसांना कलर चढत नाही. त्यामुळे कलरमध्ये ठराविक प्रमाणात अमोनिया असतो. जाहिरातींना बळी पडून ग्राहक विविध कंपन्यांचा हेअर डाय वापरतात. पण डोक्याच्या जवळील भाग, भुवई, कपाळ, मानेखालील भागाला काळसरपणा यायला सुरुवात होते. डोळ्यांची नजर कमी होऊन चष्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता वाढते. कलर केल्यानंतर डोळ्यांची जळजळ होते. कलरच्या गडद वासाने दम्यासारखा आजार उद्भवू शकतो. महाविद्यालयीन तरुणाई फॅशन म्हणून केसांना हायलाइट करणे, कलर करतात परंतु त्यानंतर योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर केसांचा पोत बदलत जातो.

हौस पडू शकते महागात!

लग्नकार्य किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर लोक सगळ्यात पहिले केसांना कलर करतात, तर काही लोक थोडेसुद्धा पांढरे होऊ देत नाहीत. डोक्यात पांढरा केस दिसला की लगेचच केसांना कलर करतात. महिन्यातून एक ते दोनदा केसांना कलर केला जातो. परंतु हीच हौस आरोग्याची हानी करत असते हे लक्षात येत नाही. दीर्घकाळ चांगली नजर, त्वचेचे आरोग्य चांगले हवे असेल तर केसांना कलर करणे टाळायला हवे.

जाणून घेऊ तज्ज्ञ काय म्हणतात…

केसांना कलर करणे नेहमी अयोग्य आहे. पांढऱ्या केसांमुळे कमी होणारा आत्मविश्वास केसांना लाल, काळी मेंदी, कलर करायला भाग पडतो. कोणत्याही कंपनीचा हेअर कलर केसांचे नुकसानच करतो. कलर मेंदी केलेले केस कोरडे व निस्तेज होतात. अधिक वेगाने पांढरे होतात. केस कमकुवत झाल्याने तुटतात व गळतात. त्यामुळे कलरचा त्वचेशी संपर्क टाळावा. – डॉ. श्रद्धा सोननीस, त्वचारोग तज्ज्ञ.

हेअर कलरची ॲलर्जी होऊन डोळ्यांची जळजळ होऊ शकते. डोळ्याचा रेटिना (पडदा) टिश्यूसारखा पातळ थर असतो. केसांना कलर केल्याने डोळ्याचा रेटिना बिघडून डोळ्याला सूज येऊ शकते. त्याचा नजरेवर परिणाम होऊन नजर कमकुमत व्हायला सुरुवात होते. तसेच चष्म्याचा नंबर वाढू शकतो. कोणताही कलर वापरताना पॅच टेस्ट करावी. – डॉ. शशिकांत आवारे, नेत्रविकार तज्ज्ञ.

हेही वाचा:

The post नाशिक : चांगली त्वचा अन् दृष्टीसाठी केसांना रंग टाळा appeared first on पुढारी.