Site icon

नाशिक : चांगल्या रस्त्यासाठी श्रमजीवी संघटनाचा रास्ता रोको

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा
पावसामुळे दुरवस्था झालेल्या त्र्यंबकेश्वर – पहिने – देवगाव रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी देवगाव फाटा येथे श्रमजीवी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणार्‍या रस्त्यांची दुरवस्था आणि कामाची गुणवत्ता खालावली असून, परिपत्रकानुसार काम न करता, थातूरमातूर कामे करून निधीची विल्हेवाट लावली जात आहे. परिणामी मुदतीच्या आतच रस्ते उखडून वाहतुकीच्या लायकीचेही राहात नाहीत. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्र्यंबकेश्वर – पहिने – देवगाव – वावीहर्ष – श्रीघाट या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती. हे रस्ते मृत्यूचे सापळे झाले होते. एप्रिल 2022 मध्ये या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडून करण्यात आली होती. मात्र, निकृष्ट दर्जाचे केलेले रस्ते काही दिवसांतच खराब होऊन पाच महिन्यांतच पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे श्रमजीवी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता खड्डेमुक्त करावा, निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, टाके देवगाव येल्याची मेट या रस्त्याचेही काम करावे आदी मागण्यांसाठी देवगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : चांगल्या रस्त्यासाठी श्रमजीवी संघटनाचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Exit mobile version