Site icon

नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारपासून (दि. १०) मका, सोयाबीन, गहू, बाजरी, मूग, उडीद, गजू, हरभरा, तूर आदी भुसार शेतीमालाच्या लिलावाचा प्रारंभ होत आहे. सोमवार ते शनिवार दैनंदिन सकाळी ११ व दुपारी ४ वाजता भुसार मालाचे लिलाव सुरू राहणार आहे.

चांदवड बाजार समितीचे कार्यक्षेत्रात मका, सोयाबीन, बाजरी आदींसह इतर शेतीमाल काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना भुसार माल विक्रीची सुविधा जवळच उपलब्ध होण्याकरिता प्रशासक प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली भुसार शेतीमालाचे आडते/खरेदीदार व्यापारी यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता भुसार शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत केंद्र शासनाचे ई-नाम योजनेंतर्गत ई-लिलावाबाबत चर्चा करण्यात आली असून, या योजनेंतर्गत भुसार शेतीमालाचे प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहेत. मात्र, शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार हंगाम सुरू असल्याने वेळीच भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी मालविक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात येणार आहे. यावेळी भुसार शेतीमाल व्यापारी गणेश वाघ, मयूर अजमेरे, संतोष जाधव, भूषण पारखे, भूषण हेडा, रत्नदीप बच्छाव, हृषिकेश आहेर आदी व्यापारी उपस्थित होते. भुसार शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला माल सुकवून व प्रतवारी करून आणण्याचे आवाहन बाजार समिती व भुसार व्यापारी असोसिएशनने केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव appeared first on पुढारी.

Exit mobile version