नाशिक : चांदवड येथे भुसार शेतीमाल लिलावास प्रारंभ

भुसार लिलाव www.pudhari.news
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
येथील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात सोमवार (दि.10) रोजी समितीच्या प्रशासक प्रेरणा शिवदास यांच्या उपस्थितीत शेतकरी संजय लक्ष्मण निकम व केदु मुरलिधर देशमाणे यांच्या हस्ते भुसार (मका, सोयाबीन, इ.) लिलावास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे शेतक-यांना भुसार माल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे.
दरम्यान, चांदवड येथे पहिल्याच दिवशी 500 क्विंटल मका शेतीमालाची आवक झाली. तसेच सोयाबिनची 600 क्विंटल ची आवक झाली. मका शेतीमालास 1400 ते 2001, सरासरी 1700 पर्यंत, मुग रु. 5201 ते 7700 सरासरी 7000/- व सोयाबिन शेतीमालास 3501 ते 5001 व सरासरी 4500/- पर्यंत बाजारभाव मिळाले. शेतीमालाची गुणवत्ता व आर्द्रतेच्या आधारावर बाजारभाव मिळाले. यावेळी बाजार समितीच्या प्रशासक प्रेरणा शिवदास, सचिव-गोरक्षनाथ गांगुर्डे, तसेच भुसार व्यापारी (सर्वश्री) गणेश वाघ, संतोष जाधव, प्रसाद सोनवणे, महेंद्र अजमेरा, रत्नदिप बच्छाव, आदि सह बाजार समिती अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसार शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा केली जात असल्याने व बाजार समितीचे आवारावर भुसार शेतीमालाची विक्री केल्यास चोख वजनमाप व रोख रक्कम मिळण्याची हमी असल्याने तसेच शेतावर शिवार खरेदीने शेतीमाल विक्री केल्यास व्यापा-याकडुन चोख वजनमाप व माल विक्रीची रक्कम तात्काळ मिळण्याची हमी नसते. त्यामुळे शेतकरी बांधवांची शेतीमाल विक्रीत फसवणुक होवू नये, याकरीता शेतकरी बांधवांनी बाजार समितीचे आवारांवरच भुसार मालाची विक्री करावी. त्याचप्रमाणे शासन स्तरावरुन अनुदान जाहिर झाल्यास त्यावेळी बाजार समितीत माल विक्रीची हिशोबपावतीच ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बाजार समितीतच शेतीमालाची विक्री करुन माल विक्रीची हिशोब पावती सांभाळुन ठेवावी. तसेच मालविक्री रक्कमेबाबत अथवा अन्य कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ बाजार समितीस कळवावे. भुसार शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात अदा केली जात असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भुसार (मका, सोयाबिन, मुग, उडीद, बाजरी, गहु, हरभरा इ.) शेतीमाल सुकवून व प्रतवारी करुन चांदवड येथे मोठ्या प्रमाणात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या प्रशासक प्रेरणा शिवदास, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे व भुसार व्यापारी असोशिएशन यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चांदवड येथे भुसार शेतीमाल लिलावास प्रारंभ appeared first on पुढारी.