नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल

mobile theif www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या चोरट्यांकडून चोरीचे ११ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितांमध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ दोन चोरट्यांनी राहुल पगारे (१९, रा. ता. दिंडोरी) यास शनिवारी (दि. ६) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास चाकूचा धाक दाखवला होता. राहुलकडील १२ हजार रुपयांचा मोबाइल बळजबरीने घेत संशयित फरार झाले होते. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास समांतर करीत असताना पोलिस अंमलदार अतुल पाटील यांना संशयितांबद्दल माहिती मिळाली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांनी पथक तयार करून संशयित सनी सोमनाथ दोडके (रा. काझीगढी, कुंभारवाडा) यास पकडून चौकशी केली. त्याच्या घरझडतीत पोलिसांना ११ मोबाइल आढळले. अल्पवयीन संशयितासोबत मिळून नागरिकांना चाकूचा धाक दाखवून व चोरी करून मोबाइल चोरत असल्याची कबुली संशयिताने दिली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन संशयितासही ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख १० हजार रुपयांचे ११ मोबाइल जप्त केले आहेत. पोलिस उपनिरीक्षक माणिक गायकर, सुनील माळी, अंमलदार शेरखान पठाण, श्रीराम सपकाळ, किशोर देसले, अतुल पाटील आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : चाकू दाखवत दोघांनी लुटले अकरा मोबाइल appeared first on पुढारी.