नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

जन्मठेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा गळा आवळून व तोंडावर दगडी पाटा मारून खून करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सागर गणपत पारधी (२३, रा. फुलेनगर) असे या आरोपीचे नाव आहे. सागर याने १८ जुलै २०२० ला पत्नीचा खून केला होता. तो पत्नी आरती पारधी (१८) हिच्यासह फुलेनगर येथील मुंजोबा गल्ली परिसरात राहत होता.

सागर आरतीच्या चारित्र्याचा संशय घेत नेहमी वाद घालत असे. १८ जुलै २०२० ला पहाटेच्या सुमारास सागरने आरतीचा गळा आवळून तसेच दगडी पाटा मारून खून केला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सागरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे, रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. सागर विरोधात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी जन्मठेप व दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम. एम. पिंगळे, डी. बी. खैरनार यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.