नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला

आनंदाचा शिधा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने ऑफलाइन पद्धतीने आनंदाचा शिधा वितरणाचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील पोर्टेबिलिटी केलेल्या सुमारे 40 हजार रेशन कार्डधारकांना शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत या लाभार्थ्यांचा आनंद हरपल्याने सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे.

देशभरात ‘वन नेशन वन रेशन’ मोहिमेत एका जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुसरीकडे ऑनलाइन पद्धतीने रेशन घेण्याचा अधिकार शासनाने बहाल केला आहे. त्यासाठी नजीकच्या दुकानांमध्ये जाऊन रेशनकार्ड पोर्टेबिलिटी करून घेणे बंधनकारक आहे. या मोहिमेंतर्गत मराठवाडा, खानदेश आणि राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून नाशिकमध्ये स्थलांतरित झालेले सुमारे 40 हजार रेशनकार्डधारक कुटुंबीय दर महिन्याला ऑनलाइन पद्धतीने रेशन घेतात. मात्र, पोर्टेबिलिटी केलेल्या या कार्डधारकांना दिवाळीसाठी शासनाने 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेला आनंदाचा शिध्यापासून वंचित राहावे लागते आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे किट ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय आहे. गेल्या गुरुवारपासून जिल्ह्यात आनंदाच्या शिध्याचे किट वितरण सुरू झाले. पण, ऑनलाइन वितरणात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी शासनाने निर्णय घेत ऑफलाइन पद्धतीने हे किट वाटपाच्या सूचना केल्या. तसेच ऑफलाइन वितरणावेळी रेशनकार्ड लाभार्थ्यांना त्यांना जोडून दिलेल्या मूळ दुकानामधून हा शिधा घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे पोर्टेबिलिटी केलेल्या कार्डधारकांना त्यांच्या मूळ गावीच हे किट उपलब्ध होईल. एकीकडे दिवाळीचा आनंद असताना शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे परजिल्ह्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या गोरगरीब जनतेच्या घरात अंधार परसला आहे.

दुकानांसमोर रांगा कायम…
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा किट पोहोचले असून, सुरळीत वितरण सुरू असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे रेशन दुकानांसमोरील रांगा आजही कायम आहेत. त्यातच काही ठिकाणच्या रेशन दुकानांमध्ये किटमधील तीनच वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्धवट किटचे वाटप कसे करावे, असा प्रश्न रेशन दुकानदारांना भेडसावत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला appeared first on पुढारी.