नाशिक : चाेरट्यांचा महिनाभरात तब्बल ८४ लाखांच्या ऐवजावर डल्ला

गुन्हे www.pudhari.news

नाशिक : गौरव अहिरे

सप्टेंबर महिन्यात चोरट्यांनी वाहनचोरी, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करून शहरातून ८४ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये ११७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी चोरट्यांकडून नागरिकांचा किंमती ऐवज परत मिळवला, परंतु अनेक गुन्ह्यांमधील ऐवज चोरट्यांच्याच ताब्यात आहेत.

शहरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी नित्याचे झाले असून पोलिस गस्त, गुन्हेगारांची धरपकड करूनही हे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो. पोलिसांकडून वाहनचोरी थांबवण्यासाठी स्वतंत्र तपासी पथक तयार केले असले तरी वाहनचोरी थांबत नसल्याचे दाखल गुन्ह्यांवरून दिसते. या पथकाने वाहनचाेरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांनाही पकडले. मात्र, वाहनचोरीचे प्रकार कायम आहेत. त्याचप्रमाणे जबरी चोरीचेही प्रकार वाढले असून, मारहाण करीत किमती ऐवज ओरबाडून नेल्याचेही प्रकार घडले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्हे उघडकीस आले आहेत, तर चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी सर्वाधिक ऐवज लंपास केला आहे. भरदिवसा व रात्रीच्या वेळी चोरी-घरफोडी करून चोरट्यांनी सोने, चांदी, रोकड व इतर किमती ऐवज लंपास केला आहे. त्यात फिर्यादींच्या ओळखीतील व्यक्तींनी घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून, त्यातील मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र, इतर गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही.

सप्टेंबरमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी अशी…

गुन्ह्यांचे स्वरूप          दाखल गुन्हे             ऐवजाची किंमत

वाहनचोरी                       ६४                          ३७,४९,०००

जबरी चोरी                      २०                           ८,६२,२५०

चोरी                                १७                           ९,५१,८००

घरफोडी                  १६                    २८,५९,०००

सोन्यावर सर्वाधिक डल्ला…

गुंतवणुकीसाठी नागरिक सोने खरेदी करत असतात. तर चोरटेही चोरी, घरफोडीमध्ये सोन्याचे दागिने चोरण्यावर भर देत असल्याचे दिसते. जबरी चोरी करून चोरट्यांनी १४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले आहेत. तर १७५.५ ग्रॅम वजनाचे दागिने चोरी केले आहेत. त्याचप्रमाणे घरफोडी करून सर्वाधिक ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानुसार चोरट्यांनी महिनाभरात ९६१.५ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. यापैकी सुमारे ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी पुन्हा मिळवले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चाेरट्यांचा महिनाभरात तब्बल ८४ लाखांच्या ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.