नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप

बिबट्याची झडप www.pudhari.news

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे शनिवारी, दि.24 सायंकाळी भरवस्तीत घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला बिबटयाने झडप घालून जबडयात पकडून माळरानात नेत क्षणार्धात धूम ठोकली. सायंकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार घडला असून, वेळुंजेत घबराट पसरली आहे. वेळुंजे येथील शेतकरी निवृत्ती दिवटे यांचा पाच वर्षाचा मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसोबत दरवाजात उभा होता. त्यावेळेस घरात आई आणि आजी स्वयंपाक करत होते. निवृत्ती दिवटे दुधाचे रतीब घालण्यासाठी त्र्यंबकला जातात. नेहमीप्रमाणे ते दूध देऊन आले व त्यांच्या पाठोपाठ जवळच दबा धरून बसलेला बिबटयाने मुलावर झेप घेत डाव साधला. दरम्यान तेथेच खेळत असलेल्या मुलीने रडायला सुरुवात केल्याने आजी बाहेर आल्यानंतर सर्व प्रकार समजला. त्यानंतर ग्रामस्थांनी रानाकडे धाव घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तपास लागलेला नव्हता. वनखात्याचे कर्मचारी आणि ग्रामस्थ सर्वत्र शोध घेत होते.

दुपारी मोटारसायकलवर झेप
दरम्यान याच भागातील नांदगाव कोहळी, हेदुलीपाडा रस्त्यावर दुपारच्या वेळेस दुचाकीस्वाराच्या अंगावर बिबटयाने झेप घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकी घसरल्याने बिबट्याने धूम ठोकल्याने दुचाकीस्वार बचावला. बिबटयाचा वावर वाढला असून, शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. दिवसा वीज नसते, रात्री शेतीला पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. परंतु बिबटयाची दहशत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
नीलपर्वत परिसरातही वावर
ञ्यंबकेश्वर शहरात नीलपर्वत बिल्वतीर्थ परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे. कोंबडया, बकर्‍या पळवल्याच्या घटना घडत आहेत. बिबटयाचे दर्शन फिरायला जाणारे, व्यायामासाठी, पळण्यासाठी बाहेर पडणारे युवक यांना होत आहे त्र्यंबकेश्वर बिल्वतीर्थ परिसरातील ग्रामस्थदेखील धास्तावले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : चिमुरड्यावर दरवाजातच बिबट्याची झडप appeared first on पुढारी.