नाशिक : चोरट्यांचा शेतमालावरही डल्ला, फुलेनगरला दहा क्विंटल सोयाबीन चोरली

नाशिक, वावी : पुढारी वृत्तसेवा
वावी परिसरात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरटे आता शेतमालावरही डल्ला मारू लागले आहेत. फुलेनगर येथील शेतकर्‍याचे 55 हजार रुपयांचे दहा क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने संबंधित शेतकर्‍याला आर्थिक फटका बसला आहे.

समृद्धी महामार्गलगत वावी-निर्‍हाळे रस्त्यावर बाळासाहेब दशरथ लोंढे यांची शेती असून, यंदाच्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. लोंढे यांनी जेमतेम उरलेले सोयाबीनचे पीक नुकतचे काढले होते. सुमारे 12 ते 13 क्विंटल सोयाबीन पोत्यांमध्ये भरून साठवले होते. रविवारी ते पत्नीसोबत राहता येथे अंत्यविधीस गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. शेतात पोत्यांमध्ये भरून ठेवलेले सोयाबीन चोरट्यांनी एका वाहनातून चोरून नेले.

सोमवारी सकाळी लोंढे शेतात गेल्यावर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. समृद्धी महामार्गापासून संरक्षक भिंतीच्या बाजूने चोरट्यांनी वाहन नेल्याचे टायरच्या खुणांवरून आढळले. लोंढे यांनी शनिवारी सोयाबीन काढल्यानंतर विक्रीसाठी काही दुकानदारांकडे नमुना म्हणून नेले होते. त्यानुसार साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीची तयारी दुकानदाराने केली होती. त्यामुळे सोमवारी गावावरून परतल्यावर सोयाबीन विक्री करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, त्याआधीच चोरट्यांनी डाव साधत त्यांना धक्का दिला.

शेतमाल साठविण्याऐवजी थेट बाजारचा रस्ता
परिसरातील शेतकर्‍यांना चोरीची घटना समजल्यावर शेतामध्ये तसेच खळ्यात पीक साठवण्यास शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. मका, सोयाबीनची काढणी झाल्यानंतर तातडीने शेतीमाल घराकडे आणण्याला किंवा थेट विक्री करण्याला शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात विक्री होत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागत आहे.

The post नाशिक : चोरट्यांचा शेतमालावरही डल्ला, फुलेनगरला दहा क्विंटल सोयाबीन चोरली appeared first on पुढारी.