नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ

पाणी दर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जलसंपदा विभागाने धरणातून उचलण्यात येणार्‍या पिण्याच्या पाणीदरात सुमारे 90 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे मनपाकडून गंगापूरसह मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी उचलल्या जाणार्‍या पाण्याच्या दरातही प्रति 10 हजार लिटरकरिता 3 रुपयांवरून थेट 5.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेवर अतिरिक्त तीन कोटींचा भार पडणार असल्याने पाणीपट्टी दरात अल्पशी का होईना वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धरणांमधून उचलल्या जाणार्‍या पाण्याचे दर तीन वर्षांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत ठरविले जातात. या आधी 2018 मध्ये पाणीदर निश्चित करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जलसंपदाने दरवाढ केली नव्हती. अन्यथा 2021 मध्ये दरवाढ झाली असती. परंतु, आता कोरोना ओसरल्यानंतर 1 जुलै 2022 पासून शेती सिंचन, घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या पाण्याच्या दरात बदल करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रासाठी धरणांमधून उचलल्या जाणार्‍या पाण्याचे दर आधी प्रति 10 हजार लिटरकरिता 3 रुपये होते. आता नव्या दरानुसार 5.50 रुपये करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेकडून गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणी उचलले जाते. त्यासाठी महापालिका जलसंपदा विभागाला दरवर्षी सुमारे 14 कोटी रुपये अदा करते. मात्र, आता 17 कोटी इतके पाणीशुल्क मोजावे लागणार आहे. नवीन दरवाढीमुळे पाणीपट्टीत अल्पशी का होईना दरवाढ केली जाऊ शकते. कोणत्याही कर आकारणीबाबत निर्णय आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला घ्यायचा असल्याने कदाचित 1 एप्रिल 2023 पासून नवीन करवाढीला नाशिककरांना सामोरे जावे लागू शकते. असे झाल्यास नागरिकांना पाणीपट्टीतील वाढीला तोंड द्यावे लागेल.

उद्योगाच्या पाणीदरात मात्र कपात
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घरगुती पाणीवापराच्या दरात वाढ केली आहे, तर दुसरीकडे मात्र औद्योगिक वापराच्या पाणीदरात वाढ न करता उलट कपात करत एकप्रकारे उद्योग क्षेत्रावर मेहेरबानीच दाखविली आहे. औद्योगिक, व्यावसायिक वापराच्या पाण्यावर सध्या प्रति 10 हजार लिटरला 5 रुपये 53 पैसे आकारले जातात. नव्या दरानुसार 2 रुपये 75 पैसे इतके पाणीशुल्क आकारले जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्यातील उद्योगक्षेत्राला मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ appeared first on पुढारी.