Site icon

नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
जायखेडा येथील जवान सारंग अहिरे यांना बुधवारी (दि.28) साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. सकाळी 11 वाजता मोठे बंधू रितेश यांनी सारंग यांस मुखाग्नी दिला.

सारंग सध्या आसाममध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. चार दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत दूरध्वनीवरून कळविण्यात आले. सारंगच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांसह नातेवाईक व संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला. तेव्हापासून सारंगचे पार्थिव आसामहून जायखेडा येथे येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर बुधवारी (दि.28) पहाटे सारंगचे पार्थिव जायखेडा येथे दाखल झाले. सकाळी 9 वाजता गावातून सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यानंतर कृष्णाजी माऊली समाधीलगतच्या मोकळ्या जागेत सारंगला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकर्‍यांनी मानवंदना दिली. तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरपंच शोभा गायकवाड व सर्व सदस्य, तालुक्यातील माजी सैनिक संघटना यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सारंग हे नववर्षात सुटीवर येणार होते. याविषयी काही दिवसांपूर्वीच त्यांनी घरच्यांना निरोप दिला होता. त्या आनंदावर विरजन पडले.

हेही वाचा:

The post नाशिक : जवान सारंगला साश्रूनयनांनी निरोप appeared first on पुढारी.

Exit mobile version