नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे विशेष अभियान

जळगाव,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)च्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात 3 ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

यात सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व सुशोभीकरण, वैयक्तिक शौचालय बांधकाम, अनुदान वितरण, बांधलेल्या शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीबाबत काम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. दरवर्षी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी स्वरूपांची कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून गाव हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात बदल करून 7 ऑक्टोबरच्या निर्णयान्वये सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. संत गाडगेबाबा अभियान व स्वच्छ भारत अभियानाच्या कामांची सांगड घालून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात दि. 3 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्याबाबतच्या सूचना गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत. या विशेष अभियानामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्याबाबत मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे विशेष अभियान appeared first on पुढारी.