नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

Bharti pawar www.pudhari.vom

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जानोरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, बँक कर्जवाटप, सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन आदी विषयांवरून अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने आरोप-प्रत्यारोपाने ही बैठक गाजली.

डॉ. पवार यांनी मोहाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दिंडोरी-उमराळे, तळेगाव-राशेगाव, जानोरी- अकराळे एअरपोर्ट रोड, मोहाडी-साकोरे- कुर्नोली, जानोरी-म्हसरूळ या रस्त्यांची कामे पावसाळा संपून दोन महिने होऊनही दुरुस्ती होत नसल्याबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच दिंडोरी-निळवंडी रस्त्यावरील पुलाचा प्रश्न पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकार्‍यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. निधी मंजूर होऊनदेखील हलगर्जीपणा होत असल्याने दोन महिन्यांत पुन्हा आढावा बैठक घेऊन कामाची विचारणा करणार असल्याची तंबी राज्यमंत्र्यांनी दिली. सध्या भूसंपादन सुरू असलेल्या सुरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाबाबत प्रांत अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिंडोरीत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले. थकबाकी वसुलीमुळे महावितरणने अनेक ठिकाणी रोहित्र बंद केल्याचा आरोप शिवसेनेचे दिंडोरी तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी केला. तसेच अनेक भागांतील वीजतारा, रोहित्र यांच्या दुरवस्थेमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी अधिकारीवर्गाला चांगले धारेवर धरल्यानंतर सध्याचे वीजबिल भरलेल्या शेतकर्‍याचा पुरवठा खंडित होणार नसल्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिली. कर्जमाफीच्या 50 हजार रुपयांचा लाभ झाला नसल्याबद्दल शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. बँकेचे कर्जवाटप, वसुलीबाबत बडोदा बँक, महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेच्या वतीने दिंडोरीचे सहायक निबंधक महेश भडांगे, बडोदा बँकेचे शाखाधिकारी सानप यांनी माहिती दिली. बैठकीस शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, प्रांत अधिकारी गणेश मिसाळ, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, माजी जि. प. सदस्य प्रवीण जाधव, शिवसेनेचे पांडुरंग गणोरे, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, योगेश तिडके, जानोरीचे सरपंच सुभाष नेहरे, हर्षल काठे, शंकरराव काठे, शंकरराव वाघ, गणेश तिडके, गणेश विधाते, विलास काठे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर appeared first on पुढारी.