नाशिक : जावयानेच चोरले सासूचे पाव किलोचे दागिने

सोने चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ध्रुवनगर येथील श्री बालाजी पॅराडाइज इमारतीत भरदिवसा घरफोडी करून २५ तोळ्यांहून जास्तीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली होती. गंगापूर पोलिसांनी तपास करून चोरट्यास पकडले असून, जावयानेच चावीचा वापर करून सासूच्या घरात घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अलोक दत्तात्रेय सानप (२३, रा. मखमलाबाद) यास अटक केली आहे. पाेलिसांनी संशयिताकडून साडेदहा लाखांपैकी साडेनऊ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत.

गंगापूर राेडवरील ध्रुवनगरमध्ये एका बंद घराची चावी चोरून चोरट्याने घरातून १० लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी मीरा शशिकांत गंभिरे (५०, रा. श्री बालाजी पॅराडाइज, माेतीवाला काॅलेजजवळ) यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली हाेती. ही घटना शनिवारी (दि.२४) दिवसभरात घडली हाेती. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संशयित अलोकचा वावर तेथे आढळून आला. त्याची देहयष्टी व चालण्याच्या लकबीवरून पोलिसांनी संशयावरून त्यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी चावी चोरून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी नऊ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे २४९ ग्रॅम सोन्याचे दागिनेे जप्त केले आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, सरकारवाडा विभागाच्या सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, गुन्हे शोध पथकातील सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार सचिन सुपले, भारत बोळे, अंमलदार गिरीश महाले, समाधान शिंदे, योगेश चव्हाण, सोनू खाडे यांनी ही कामगिरी केली.

सासू पार्लर व्यावसायिक

पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या मीरा गंभिरे यांच्या मुलीशी अलाेकचा विवाह झाला असून, त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, सध्या ताे बेराेजगार आहे. तसेच त्याचे सासुरवाडीला येणे-जाणे असल्याने त्याला घरातील वातावरणाची बरीचशी माहिती झाली हाेती. त्यामुळे त्याने घराच्या लाॅकच्या दाेनपैकी एक चावी चाेरली हाेती. त्यानंतर चाेरी करीत दागिने लंपास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जावयानेच चोरले सासूचे पाव किलोचे दागिने appeared first on पुढारी.