नाशिक : जिजाऊंच्या जिवंत देखाव्याने वेधले लक्ष

राजमाता जिजाऊ,www.pudharinews

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

जिजाऊ आईसाहेबांचा जिवंत देखावा, विद्यार्थ्यांचे आकर्षक ढोल पथक, कराटे, ज्युदो, रोप मल्लखांब, स्केटिंग, जिम्नॅस्टिक यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. निमित्त होते राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे.

शिवछत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांच्या संघर्षमय जीवनाची क्रांतिगाथा मांडणारी तीनदिवसीय व्याख्यानमाला कालिदास कलामंदिरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शहरात गुरुवारी (दि. 1) शोभायात्रा काढण्यात आली होती. हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी गर्जना करत विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या उत्सवानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि दस्तऐवज नागरिकांना बघायला मिळाला. शूर सेनापतींच्या वंशजांसोबत शहरातील नामवंत खेळाडू, विद्यार्थी व कलापथके मोठ्या संख्येने उपस्थित होती. याप्रसंगी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे उपस्थित होते.

जिवंत देखावा आकर्षण

शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते जिजाऊ आईसाहेबांचा जिवंत देखावा. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची गळ्यातील कवड्यांची माळ, हंबीरराव मोहितेंची वाघ नखे, हिंमतबहादूर चव्हाणांची लखलखती तलवार यावेळी पालखीतून मिरविण्यात आली. त्यामुळे नाशिककरांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला.

शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचा इतिहास आताच्या पिढीला कळावा, या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शोभायात्रेनिमित्त शाळेतील शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

-शाहू खैरे, अध्यक्ष संस्कृती, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : जिजाऊंच्या जिवंत देखाव्याने वेधले लक्ष appeared first on पुढारी.