नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

गंगापूर धरण नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, गौतमी, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज वगळता, उर्वरित
19 धरणांमधून विसर्ग केला जात आहे.

पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली, तरी मागील संपूर्ण आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगले पर्जन्य झाल्याने त्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. आजमितीस धरणांमध्ये 60 हजार 838 दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 37 हजार 41 दलघफू म्हणजे 56 टक्के साठा होता. जिल्ह्यात तूर्तास पावसाने उघडीप दिली असली, तरी पाण्याची आवक कायम असल्याने गंगापूर, दारणा, पालखेडसह तब्बल 19 प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण समूह असलेल्या गंगापूरमधील चारही प्रकल्प मिळून 9 हजार 885 दलघफू साठा निर्माण झाला असून, त्याचे प्रमाण 98 टक्के आहे. दारणा समूहातील सहा प्रकल्पांमध्ये 18 हजार 115 दलघफू म्हणजेच 96 टक्के साठा आहे. याशिवाय पालखेड समूहातील तीन प्रकल्प मिळून 7,174 दलघफू (86 टक्के), तर ओझरखेड समूहातील तीन प्रकल्पांत एकूण 3,144 दलघफू (98 टक्के) पाणीसाठा आहे. गिरणा खोर्‍यातील चणकापूर समूहातील पाच प्रकल्पांत 20,856 दलघफू म्हणजेच 90 टक्के साठा आहे. तसेच पुनद समूहातील दोन्ही प्रकल्प मिळून 1,303 दलघफू (79 टक्के) साठा आहे.

धरणांमधील विसर्ग (क्यूसेक)

गंगापूर २,८१४, दारणा ५,७५०, आळंदी ३०, पालखेड ५,५७२, करंजवण ४,२३९, वाघाड १,२३९, ओझरखेड १,१२०, पुणेगाव २८२, तिसगाव २६०, भावली ५८८, मुकणे १,०८९, वालदेवी १८३, कडवा १,५६८, नांदूरमध्यमेश्वर २८,५४१, भोजापूर १९०, चणकापूर २,११९, हरणबारी १,२२२, केळझर ३८८, गिरणा ९,०५४

मराठवाड्याला इतके पाणी

नाशिक जिल्ह्यातून 1 जूनपासून ते आजपर्यंत मराठवाड्यापर्यंत 64 हजार 359 दलघफू म्हणजेच 64 टक्क्यांहून अधिक पाणी पोहोचले आहे. जिल्ह्यातील धरणांमधून अद्यापही विसर्ग कायम आहे. त्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली आहे. परिणामी भविष्यात नाशिककरांना मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग appeared first on पुढारी.