नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार

जाती प्रमाणपत्र www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची धावपळ सुरू आहे. जातवैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडायला नको, यासाठी नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशेष काळजी घेत 21 हजार अर्जांपैकी 20 हजार अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या या कामगिरीमुळे अनेक विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करत आभार व्यक्त केले जात आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यात प्रवेश हुकतो की काय अशी स्थिती असताना अशा अनेक विद्यार्थ्यांना समितीने तत्परता दाखवत जातवैधता प्रमाणपत्र मिळवून दिल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंग, वैद्यकीय तसेच एमबीए यांसारख्या शिक्षणाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुढेही कुणाही विद्यार्थ्यांचे प्रवेश जातवैधता प्रमाणपत्राअभावी रखडणार नाही यासाठी समितीचे सदस्य तथा समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त माधव वाघ यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयाकडे गेल्या 10 महिन्यांत जानेवारी 2022 पासून एकूण 21 हजार 499 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 20 हजार 421 इतके अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. अर्जदारांना ऑनलाइन ई-मेलव्दारे वैधता प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. उर्वरित 1,078 अर्जांपैकी 942 अर्ज त्रृटींचे असून, ते अर्जदार स्तरावर आहेत. अर्जदारांना त्रृटी पूर्तता करण्यासाठी कळविण्यात आले आहे.

अर्जदारांचे वैधता प्रमाणपत्र हे ऑनलाइन सिस्टिमव्दारे अर्जदारांच्या ई-मेलवर प्राप्त होत असल्याने अर्जदारांनी स्वत:चा ई-मेल आणि मोबाइल नंबर अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. – माधव वाघ, सदस्य, नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती.

मला जात प्रमाणपत्र आवश्यक तत्पर हवे होते. त्यासाठी समितीला विनंती केली. चार-पाच दिवसांतच मला प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळेच पुढच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. – आर्यन पगार, विद्यार्थी.

अगदी सुटीच्या दिवशी मला त्रृटींची पूर्तता करून लगेचच प्रमाणपत्र मिळाले. तुम्ही जर मला वेळीच वैधता प्रमाणपत्र दिले नसते, तर माझे शिक्षणच अर्धवट राहिले असते. मी आपली कायम आभारी आहे. – आभा निकुंभ, विद्यार्थिनी.

एका प्रमाणपत्राने माझे आयुष्य बदलून जाणार आहे. कारण त्यावरच माझे पुढील शिक्षणाचे व करिअरचे भवितव्य अवलंबून होते. सहकार्य आणि मदत करण्याचा आपला मार्ग मीदेखील आयुष्यात पुढे कायम ठेवील. – अक्षय बिडे, विद्यार्थी.

हेही वाचा:

 

The post नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा विद्यार्थ्यांना आधार appeared first on पुढारी.