Site icon

नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) आयोजित जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या बैठकीला नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली. त्यामुळे शिंदे गटातील नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. दरम्यान, आम्ही त्रिमूर्ती एकत्रित असल्याचे सांगत ना. दादा भुसे यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा नियोजन आणि आ. कांदे वाद हे जणूकाही समीकरण बनले आहे. आ. कांदे यांनी निधीवाटपाहून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात बाहू सरसावल्याने ते चर्चेत आले. दरम्यानच्या काळात राज्यातील सत्ता बदलानंतर तरी हा वाद संपुष्टात येईल, असे भाकीत वर्तविले जात होते. पण, ना. भुसे यांच्या एककल्ली कारभाराविरोधात आ. कांदे यांनी वेळोवेळी खदखद उघड केल्याने वादाचा मुद्दा अधिकच चिघळला. त्यात ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या 2023-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना नियोजन बैठकीत आ. कांदेसह खा. गोडसे हे गैरहजर होते. या दाेघांच्या अनुपस्थितीमुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

कांदे-गोडसेंच्या अनुपस्थितीकडे ना. भुसे यांचे लक्ष वेधले असता आम्ही त्रिमूर्ती एकत्र आहोत. तसेच आ. कांदे यांनी मतदारसंघातील कामे व मुंबईतील महत्त्वाच्या कामामुळे बैठकीतील गैरहजेरीबद्दल पहिलेच आपल्याला कल्पना दिली आहे. तसेच खा. गोडसे हे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या खुलाशानंतरही दोघांच्या अनुपस्थितीवरून चर्चांना उधाण आले.

राष्ट्रवादीच्या आमदारांचीही दांडी

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर व सरोज अहिरे यांनीही बैठकीला दांडी मारली. तर नितीन पवार हे उपस्थित असले तरी त्यांनी बैठकीत बोलणे टाळले. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे काही गांभीर्य नाही उरले का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

…त्यावर बोलणे उचित नाही

अधिकृत शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोमवारी (दि. १२) सुनावणी होती. यावर ना. भुसे यांना विचारले असता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोग सुनावणी घेत आहे. आजची सुनावणी तर होऊ द्या. तत्पूर्वीच त्यावर बोलणे उचित नाही, असे सांगत ना. भुसेंनी अधिकचे बोलणे टाळले.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत appeared first on पुढारी.

Exit mobile version