नाशिक : जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या निनादल्या

zp www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुनी पेन्शन लागू करण्यासोबतच विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २०) जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमध्ये राज्य सरकारी, जिल्हा परिषद – निमसरकारी, शिक्षक, चतुर्थ श्रेणी व जुनी पेन्शन हक्क कर्मचारी संघटना जिल्हा समन्वय समितीच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत थाळीनाद करत पंचायत समिती तसेच जि.प.च्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. यामध्ये प्रामुख्याने एकच मिशन, जुनी पेन्शन, कर्मचारी एकजुटीचा विजय असो, सर्व संवर्गीय संघटनांचा विजय असो आदी घोषणांचा समावेश होता. राज्यात मंगळवार (दि. १४) पासून लाखो शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यात नाशिक जि.प.तील सुमारे १६ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयात शुकशुकाट बघायला मिळत आहे. परिणामी मार्चएण्डिंगच्या सुमारास प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. जि.प. तसेच पंचायत समिती कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामध्ये जि.प. कर्मचारी महासंघाचे अरुण आहेर, कर्मचारी युनियनचे विजयकुमार हळदे, लिपिक वर्गीय संघटनेचे प्रमोद निरगुडे, परिचर संघटनेचे विजय शिंदे, प्रयोगशाळा वैज्ञानिकचे मधुकर आढाव, पशुसंवर्धनचे भगवान पाटील, जि.प. कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पिंगळे, कर्मचारी बँकेचे संचालक अजित आव्हाड, आरोग्य कर्मचारी विजय सोपे, औषध निर्माण संघटनेचे विजय दराडे, लेखा कर्मचारी संघटनेचे दिनकर सांगळे, लिपिक हक्क संघटनेचे नीलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

शासनाने बेमुदत संपाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर हा संप मागे घ्यायचा की नाही, हे ठरवण्यात येईल. अन्यथा हा संप सुरूच राहणार आहे. – अरुण आहेर, पदाधिकारी.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या निनादल्या appeared first on पुढारी.