नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘इकोब्रिक्स’ हा स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरणाला हातभार लावला आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषणाला थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास हातभार लागत आहे.

प्लास्टिक प्रदूषण ही आजच्या घडीला सर्वत्र महत्त्वपूर्ण समस्या झाली आहे. त्यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. त्यापैकीच इकोब्रिक्स हा लोकप्रिय उपाय अंमलात आणला जात आहे. इकोब्रिक्स म्हणजे प्लास्टिक कचर्‍याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या होय. या बाटल्या घर बांधकामात व रस्ते तयार करण्यासाठी वापरल्या जातात. ते पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर आहे. तसेच प्लास्टिक कचरा पुन्हा वापरण्याचा एक सर्जनशील मार्गदेखील आहे. मुंढेगाव येथील जि.प. शाळेतील उपक्रमशील शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी 350 विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने गेल्या वर्षभरापासून इकोब्रिक्स हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या 378 इकोब्रिक्स शाळेत तयार आहेत. विद्यार्थ्यांना इकोब्रिक्सची संकल्पना, पर्यावरणातील त्याचे महत्त्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला, असे शिक्षक अनिल बागूल यांनी सांगितले. इमारत बांधकामास इकोब्रिक्स वरदान ठरणार आहे. मुख्याध्यापिका रेखा शेवाळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सरला बच्छाव, मालती धामणे, विमल कुमावत, सुनंदा कंखर, ज्योती ठाकरे, हेमलता शेळके, भगवान देशमुख, राजकुमार रमणे आदी शिक्षकांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

इकोब्रिक्स www.pudhari.news
इकोब्रिक्स www.pudhari.news

कसे असते इकोब्रिक्स…
जुन्या, निरुपयोगी प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्याऐवजी त्यामध्ये प्लास्टिकचे रॅपर्स, चिप्स व चॉकलेटचे रॅपर्स, सुका प्लास्टिक कचरा किंवा पॉलिथीनचे पॅकेट गच्च भरणे आणि झाकण बंद करणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा परिषद शाळेत राबवला पर्यावरणपूरक ‘इकोब्रिक्स’ appeared first on पुढारी.