नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण

जिल्हा बॅंक वसुली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी संकटामुळे आर्थिक संकटात आहे. गारपीट, अवकाळी तसेच दोन वर्षे कोरोना यांमुळे शेती तोट्यात आहे. यामुळे शेतकऱ्याची कर्ज भरण्याची ऐपत नसून एनडीसीसी बँकेने सुरू केलेली जमीन जप्ती, लिलाव, दंडेलशाही थांबविण्याच्या मागणीसाठी त्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी (दि.1) धरणे व आमरण उपोषण सुरू केले आहे.

आंदोलनात शेतकरी संघटना समन्वय समिती राज्याध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे सुधाकर मोगल यांच्यासह जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत. याबाबत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत एनडीसीसी अर्थात जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे कर्ज घेतेवेळी कर्ज करारानुसार 5% शेअर्स कपात केला आहे. त्या शेअर्स रक्कमेवरील 15% व्याज शेतकरी भरत आहेत. सध्या जिल्हा बँकेकडून होणारी सक्तीची कर्जवसुली त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे. सक्तीच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून बँकेच्या दंडेलशाही व कर्जवसुली धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतुने शासनानेच कर्जाची सर्वस्वी जबाबदारी घ्यावी किंवा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. या बेमुदत धरणे व आमरण उपोषण आंदोलनामार्फत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असून आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन तसेच एनडीसीसी बँकेचे प्रशासक व अधिकारी जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण appeared first on पुढारी.