नाशिक : जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी एकाने जिल्हा रुग्णालयात पोलिसांना धक्काबुक्की करीत रुग्णालयात तोडफाेड केली. संशयिताच्या पत्नीनेही रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची काच फोडून नुकसान केल्याचा प्रकार शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित योगेश दत्तू क्षीरसागर (३८) व अनिता क्षीरसागर (दोघे रा. कुमावतनगर) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

औरंगाबाद येथील रहिवासी मोहिज फिदारी सैफी यांना सात लाखांचे २३ लाख रुपये करून देतो, असे सांगून चार संशयित भामट्यांनी सैफी यांना गंडा घातला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी सुरुवातीस दोघांना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करून पंचवटी पाेलिसांनी योगेश क्षीरसागरला ताब्यात घेतले होते. शनिवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास योगेशला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले होते. आपल्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होत असल्याचे लक्षात येताच क्षीरसागरने पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत आत्महत्या करण्याची धमकी देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. त्यात क्षीरसागरच्या हात व डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर अनिता क्षीरसागर हिनेही रुग्णालयाची काच फोडून नुकसान केले.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात तोडफोड केल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.