नाशिक : जिल्ह्यातील धोकादायक क्षेत्रांचा होणार सर्व्हे

एनडीआरएफ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) सहा सदस्यीय पथक दाखल झाले आहे. हे पथक पुढील पाच दिवस जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे व उद्योगांचे सर्व्हे करणार आहे. भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा सराव करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये मानवी मृत्यू व जखमींचे प्रमाण वाढले असून, मालमत्तांनाही हानी पोहोचते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. पथकातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यातील धोकादायक उद्योग, ठिकाणे तसेच पूरप्रवण क्षेत्राची पाहणी करणार आहेत. या पाहाणीवेळी आपत्तीच्या घटनांचे स्वरूप, आपत्ती निवारणासाठीची तयारी यासह अशा भागांतील लोकसंख्या आदींची माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून भविष्यात सप्तशृगगड परिसरात रोप-वे प्रस्तावित आहे. त्यामुळे हे पथक एकदिवस गडावर भेट देऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यावेळी पथकातील सदस्य शासकीय व औद्योगिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेणार आहे.

जिल्ह्यात दाखल झालेले पथक पाहणीचा अहवाल तसेच भविष्यात कोणतीही आपत्ती ओढवल्यास करावयाच्या उपाययाेजनांचा अहवाल तयार करणार आहे. तसेच हा अहवाल केंद्रस्तरावर एनडीआरएफला सादर केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यामध्ये एखादी आपत्ती ओढवल्यास त्यामध्ये हानीची तीव्रता कमीत कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा

The post नाशिक : जिल्ह्यातील धोकादायक क्षेत्रांचा होणार सर्व्हे appeared first on पुढारी.