नाशिक : जिल्ह्यातील महामार्ग ‘समृद्धी’च्या प्रतीक्षेत

Nashik Disconnect www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी
बहुप्रतीक्षित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि बहुचर्चित सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे भविष्यात नाशिकच्या विकासाची स्वप्ने रंगवली जात असताना, जिल्ह्यातील सध्याच्या महामार्गांची दुरवस्था झाली आहे. नाशिक-मुंबई महामार्ग खड्ड्यात गेला असून, जिल्ह्यातील अन्यही राष्ट्रीय, राज्य व जिल्हाअंतर्गत मार्गांची चाळण झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा प्रवास खडतर झाला आहे.

मुंबईला उत्तर भारताशी जोडणारे शहर म्हणून नाशिक परिचित आहे. महाराष्ट्राची कृषिपंढरी म्हणून ओळख असणार्‍या नाशिकने गेल्या काही वर्षांत देशाची वाइन कॅपिटल आणि एज्युकेशन हब म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. परंतु, या नव्या ओखळीसोबत आता खड्ड्यांचे शहर म्हणून नाशिक सर्वदूर परिचित होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असलेल्या नाशिक-मुंबई रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. नाशिक शहराच्या वेशीपासून ते कल्याण फाट्यापर्यंतच्या महामार्गावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. त्यामुळे नाशिककरांना मुंबई गाठण्यासाठी जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे. नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गत दोन ते तीन वर्षांत या महामार्गाचे चौपदरीकरण झाले. मात्र, त्यासोबत महामार्गावरील ट्रॅफिकमध्ये वाढ झाल्याने नाशिक-पुणे प्रवासासाठी किमान 5 तासांचा कालावधी लागतो. दरम्यान, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-वणी-सापुतारा या महामार्गांची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. नाशिक-पेठ-गुजरात महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले असले, तरी वाहनचालकांच्या समस्या मात्र कायम आहेत. प्रमुख महामार्गांसह जिल्ह्यांतर्गत व प्रमुख गावांना जोडणार्‍या रस्त्यांची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत प्रवासाला अधिक वेळ खर्ची पडत आहे. त्यातच रस्त्यांच्या समस्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यूंच्या यादीत नाशिक अव्वल स्थानी आहे. नाशिककरांसाठी ही शरमेची बाब आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचा बिंदू असूनदेखील रस्ते, रेल्वे, विमान या सेवांबाबत नाशिकवर नेहमीच अन्याय झालेला आहे. परिणामी गत काही वर्षांत राज्याच्या औद्योगिक नकाशावरून नाशिक डिसकनेक्ट झाले असून, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसत आहे. जिल्ह्याचे हे चित्र पालटून महामार्ग समृद्ध करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्रित लढा उभारणे गरजेचे आहे.

सक्सलेनच्या घोषणेचे पुढे काय?
सिक्सलेन सिमेंट-काँक्रीटचा उभारण्याची घोषणा नाशिकमध्ये केली होती. मात्र, घोषणेपलीकडे महामार्गची दुरवस्था कायम आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच याबाबत ना. गडकरी यांच्याकडे पाठपुराव्याची ग्वाही दिली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील एकाही पक्षाच्या लोकप्रतिनिधीला या प्रश्नी आवाज उठवण्याची सद्बुद्धी न होणे, यापेक्षा नाशिककरांसाठी दुसरे दुर्दैव काय असावे?

अन्य रस्त्यांसाठी आंदोलन उभारावे
नाशिक ते कल्याणपर्यंत महामार्गावरील खड्ड्यांवरून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आठवडाभरापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत महामार्गावरील खड्डे न बुजवल्यास 1 नोव्हेंबरपासून टोलवसुली बंद पाडू, असा इशारा दिला. त्यानंतर यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतही आंदोलन उभारावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यातील महामार्ग ‘समृद्धी’च्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.