नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींना लाभणार उपसरपंच

ग्रामपंचायत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील 194 ग्रामपंचायतींमध्ये 1 नोव्हेंबरला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेमधून निवडून आलेल्या थेट सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेत उपसरपंचाची निवड केली जाईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चार तालुक्यांमधील 194 ग्रामपंचायतींना थेट सरपंचांसह नव्याने कारभारी लाभले आहेत. दिवाळीपूर्वीच निकाल हाती आल्याने नूतन सभासदाची दिवाळी जोरदार आहे. सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर ग्रामस्थांच्या नजरा उपसरपंचाच्या निवडीकडे लागल्या आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने उपसरपंचपदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलविली आहे.

निवडणुका पार पडलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एका पक्षाचा, तर अन्य पॅनल दुसर्‍या पक्षाचे असे विचित्र त्रांगडे निर्माणझाले आहे. त्यातच सरपंचपदाची संधी हुकल्याने किमान उपसरपंचपदी वर्णी लागावी, यासाठी सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळते आहे. त्यामुळे या पदावर कोण विराजमान होणार आणि कोणाचे फटाके फुटणार हे येत्या 1 तारखेलाच स्पष्ट होईल. तोपर्यंत ग्रामस्थांची उत्सुकता ताणलेली असणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींना लाभणार उपसरपंच appeared first on पुढारी.