नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 82 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 18) झालेल्या मतदानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भरपावसात मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त केले. तिन्ही तालुक्यांत दुपारी साडेतीनपर्यंत 74 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवारी (दि. 19) मतमोजणी पार पडणार आहे.

नाशिक, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांधील 82 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने मतदानाला प्रतिसाद मिळण्यावरून प्रशासन चिंतेत होते. तर उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते धास्तावले होते. मात्र, मतदारांनी सार्‍याच शंका फोल ठरवल्या. तिन्ही तालुक्यांत दुपारी 3.30 पर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 87 पैकी एक लाख 6 हजार 906 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला असून, त्याचे प्रमाण 74 टक्के इतके आहे.

मतदान केंद्रांसमोर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या. दुपारी काही काळ मतदानाची गती संथ झाली होती. 4.30 नंतर पुन्हा मतदारांनी उत्साह दाखविल्यामुळे अनेक केंद्रांवर सायंकाळी 5.30 नंतरही मतदानासाठीची लगबग पाहायला मिळाली. भरपावसातही मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सोमवारी (दि.19) सकाळी 8 पासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात येईल. दुपारी 12 पर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली.

दिंडोरी तालुक्यात 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या मतदानासाठी भर पावसातही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदान शांततेत पार पडले असून, कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही. बहुतांश ठिकाणी 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींसह लहान ग्रामपंचायतींमध्येसुद्धा अतिशय चुरशीने मतदान झाले. आज सकाळी 7.30 ला मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. परंतु साडेनऊनंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी तारांबळ उडाली. जानोरी, मोहाडी, मडकीजाम, वरखेडा, जऊळके दिंडोरी, तळेगाव दिंडोरी येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. जऊळके दिंडोरी येथील वॉर्ड क्रमांक 3 मधील मतदान केंद्रात यंत्रात बिघाड झाल्याने एक तास मतदान प्रक्रिया बंद होती. दुरुस्तीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. पावसामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मंडपची व्यवस्था करण्यात आली होती.

दिंडोरी : जानोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी केंद्राबाहेर लागलेल्या रांगा. (छाया : समाधान पाटील)

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी मोहाडी ग्रामपंचायतीत 6658 पैकी 5113 मतदारांनी म्हणजेच सरासरी 76 टक्के मतदानाचा हक्क बजावला. जानोरी ग्रामपंचायतीच्या 5519 मतदारांपैकी 4312 मतदारांनी सरासरी 78 टक्के मडकीजाम येथे 2218 पैकी 1961 मतदारांनी हक्क बजावला. तळेगाव दिंडोरीत 92 टक्के, दहेगावला 88 टक्के, वरखेडा 79 टक्के मतदान झाले.

देहरेत अडकले कर्मचारी
देहरे येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेलेले कर्मचारी नदीला आलेल्या पाण्यामुळे गावातच अडकून पडले. अंतिम वृत्त हाती येईपर्यंत अनेक गावांतील आकडेवारी मिळू शकलेली नाही.

कळवण तालुक्यात 80 टक्के मतदान
कळवण तालुक्यातील 19 थेट सरपंचपदासाठी, तर ग्रामपंचायतींच्या 89 सदस्यांसाठी आज झालेल्या निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली. सोमवारी (दि. 19) पंचायत समिती सभागृहात मतमोजणी होणार आहे. आज सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावायला सुरुवात केली होती. दिवसभर मतदारांच्या रांगा होता. पाऊस असूनही मतदारांचा उत्साह कायम होता.

वणीत इतके मतदान…
वणी ग्रामपंचायतीसाठी शहरातील 12,223 मतदारांपैकी 8,576 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाऊस असतानाही मतदारांनी उत्साह दाखविल्याने तब्बल 70 टक्के मतदान झाले.
थेट सरपंच निवड व सतरा सदस्यांसाठी मतदान होत आहे. सहा प्रभागांसाठी मतदान सुरू आहे. दुपारपर्यंत पाऊस कमी होता तोपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. दुपारपर्यंत पावसाची ये-जा सुरूच होती. चारनंतर पावसाने चांगलाच जोर धरल्याने मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. सर्वच प्रभागात वणी पोलिस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपूत यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. महसूल विभागाच्या वतीने तलाठी समाधान केंग व भास्कर कोरडे यांनी प्रशासकीय जबाबदारी सांभाळली.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा आज फैसला appeared first on पुढारी.