नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित

नुकसानभरपाई निधी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मालमत्तांसाठी शासनाने 48 लाख 49 हजारांचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच अतिवृष्टीबाधितांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सिन्नरला अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. तत्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.

जून ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे पशुधन हानीसह कच्ची-पक्की घरे, झोपडी, जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. बाधितांना वाढीव मदतीचा निधी देण्याचा निर्णय घेताना जिल्ह्यांना मदतनिधीचे वाटप केले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी 48 लाख 49 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात जून व जुलैतील नुकसानीसाठी 25 लाख 49 हजार, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील नुकसानभरपाईसाठीच्या 23 लाख रुपयांचा समावेश आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीमध्ये मुख्यत्वे ज्या घरांची पडझड झाली आहे किंवा ज्या पात्र घरांमध्ये, दुकानांमध्ये सामानाची नासधूस झाली आहे, अशा मालमत्तांचा मुख्यत्वे समावेश आहे. तसेच ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर केला आहे, त्यासाठीच तो खर्च करण्याचे निर्देश शासनाने जिल्ह्यांना दिले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानींचेही तातडीने पंचनामे करून मदतीसाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनामार्फत सुरू आहे.

राज्यासाठी 27.93 कोटींचे अनुदान
राज्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी शासनाने 27 कोटी 93 लाख 84 हजार रुपये निधी मंजूर केला. विभागीय आयुक्तांमार्फत हा निधी जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. मंजूर निधीमध्ये 7 कोटी 24 लाख 66 हजार तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर काळातील मालमत्तेच्या नुकसानीकरिता 20 कोटी 69 लाख 18 हजार रुपयांचा समावेश आहे.

वाढीव मदतीचे आदेश
जून व सप्टेंबरदरम्यान नुकसान झालेल्या मालमत्तांना वाढीव भरपाई देण्यासंदर्भात शासनाने 11 ऑगस्टला आदेश काढला होता. त्यानुसार या चार महिन्यांतील नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने 27 कोटींहून अधिक निधी जिल्ह्यांना उपलब्ध करून दिला.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईचे 48 लाख रुपये वितरित appeared first on पुढारी.