नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट 

द्राक्ष निर्यात,www.pudhari.news

लासलगाव : (जि. नाशिक) राकेश बोरा

अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून यंदा निर्यातीत २० टक्के घसरण झाल्याचा अंदाज आहे. द्राक्ष निर्यातक्षम जिल्हा म्हणून नाशिकची जगभरात ओळख आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामधून ९५ हजार २२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली असून या ८०५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट तसेच खते, औषधांचे वाढलेले भाव अन‌ शेतमालास कवडीमोल बाजारभाव अशा अनेक संकटांत शेतकरी सापडला असून ४० रुपये किलोने सौदा झालेले द्राक्ष अवकाळी पावसाने सहा तासांत चार रुपये किलोने देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकरी लाखो रुपये खर्चून हाती काहीच येणार नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामध्ये द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. काही द्राक्ष घडातून खाडी पडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अक्षरशः फोन बंद करून ठेवल्याची स्थिती आहे. या सर्वांचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष निर्यातीला बसला आहे.

प्रमुख देशांतील द्राक्ष निर्यात आकडेवारी

बांगलादेश : ३७,४७७ मेट्रिक टन – १५२ कोटी

नेदरलँड – १६,१४७ मेट्रिक टन – २०४ कोटी

युनायटेड अरब : ७,१०६ मेट्रिक टन – ७६ कोटी

रशिया – ५,०२५ मेट्रिक टन – ६९ कोटी

यूके – ४,०८४ मेट्रिक टन – ५३ कोटी

अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये द्राक्षांना तडे गेल्याने आज द्राक्ष मातीमोल भावात विक्री करावे लागत आहे.

– कैलास भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

 

पर्यावरणीय बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा ठरत आहे. सिंचन सुविधा असली, तरी रोज बदलत्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. दरवर्षी द्राक्षबागांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

– संजय गवळी, द्राक्षउत्पादक शेतकरी, खडक माळेगाव

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष निर्यातीत 20 टक्के घट  appeared first on पुढारी.