नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर

महाआरोग्य शिबिर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या समन्वयाने महाआरोग्य शिबिर गुरुवार (दि.15)पासून सुरू होत आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी शिबिराची तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 106 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 592 आरोग्य उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी, आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय व आरोग्य अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार असून, निदान व उपचार मोफत केले जाणार आहेत. आरोग्य शिबिरात हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, क्षयरोग तपासणी, दंतरोग, नाक, कान, घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी, रक्त-लघवी तपासणी, एक्स-रे अशा 24 विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी गरज भासल्यास जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून रुग्णांवर जिल्हा रुग्णालय नाशिक आणि जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यातील गरजूंना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत अंतर्गत येणार्‍या शस्त्रक्रियेचा मोफत लाभही गरजूंना मिळणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे संनियंत्रण केले जाणार असून, पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या शिबिराचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच आपल्या परिसरातील नागरिकांना या शिबिराविषयी माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर appeared first on पुढारी.