नाशिक : जिल्ह्यात उद्यापासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण

Vaccination for children

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील शहरात व ग्रामीण भागात सर्व आरोग्य संस्थांच्या वतीने 15 ते 25 डिसेंबर यादरम्यान गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार नेहेते यांच्या संनियंत्रणामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 आरोग्य उपकेंद्र सज्ज आहेत.

डिसेंबर महिन्यात गोवर प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस तर दुसरा डोस 15 ते 25 जानेवारी या कालावधीत दिला जाणार आहे. त्यासंदर्भात नियोजन आखण्यासाठी शहर व जिल्ह्यातील 9 ते 12 आणि 16 ते 24 वयोगटातील मुलामुलींची माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ग्रामीण भागात पहिला डोस 2 हजार 778 व दुसरा डोस 2 हजार 684 लाभार्थींना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 518 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात उद्यापासून गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण appeared first on पुढारी.