नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान

Chandwad kanda www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीनिमित्त बंद असलेले कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (दि.31) पासून नियमित सुरू करण्यात आले आहेत. दीपावलीनंतर आज पहिल्याच दिवशी उन्हाळ कांदा शेतमालाची अंदाजित 3500 क्विंटलची आवक झाली असून, उन्हाळ कांद्यास कमीत कमी 1111 व जास्तीत जास्त 3000 भाव मिळाला आहे. कांद्याला सरासरी 2350 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर बाजार समितीतील आवकेचा विचार करता आवकेत कोणत्याही प्रकारची वाढ अथवा घट बघावयास मिळालेली नाही. बाजार समितीतील आवक स्थिर आहे. मात्र, बाजारभावात 900 ते 1000 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भुसार शेतमालाची 1500 क्विंटल आवक झालेली असून, मका शेतमालास कमीत कमी 1501 ते जास्तीत जास्त 2000, तर सरासरी 1900 पर्यंत दर मिळाला. सोयाबीन शेतमालास कमीत कमी 3500 ते जास्तीत जास्त 5300, तर सरासरी 4900 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. कांदा, मका व सोयाबीन या शेतमालाच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला आहे.

मनमाड : दिवाळीनिमित्त दहा दिवस बंद असलेली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (दि. 31)पासून कांद्याचे लिलाव सुरू होताच सरासरी भावात क्विंटलमागे 540 रुपयांची सुधारणा झाली आहे. दहा दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 1860 रुपये भाव मिळाला होता. त्यात 540 रुपयांची सुधारणा होऊन आज 2 हजार 400 रुपये इतका भाव मिळाला आहे. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांत होती. सर्वच ठिकाणी भावात सुधारणा झाल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान होऊन उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे कांद्याला प्रतिक्विंटल 4 हजार रुपये भाव मिळाला, तर आमच्या हातात काही पडेल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. 21 ऑक्टोबरपासून बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद होते. दहा दिवसांनंतर आज लिलाव सुरू होताच पहिल्याच दिवशी कांद्याची मोठी आवक झाली. आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भावात घसरण होईल, असे शेतकर्‍यांना वाटत होते. मात्र, सध्या देशात कांद्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी चांगला भाव देऊन कांदा खरेदी केला. आज कांद्याला कमीत कमी 1011 रुपये, जास्तीत जास्त 3100 रु., तर सरासरी 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

लासलगाव : कांद्याचे लिलाव सोमवार, दि.31 ऑक्टोबर पासून पूर्ववत सुरू होताच कांद्याच्या बाजारभावात साडेसातशे रुपयांची मोठी वाढ झाल्याने कांद्याचे प्रतिक्विंटल कमाल बाजारभाव तीन हजार रुपयांवर गेल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. दिवाळीचा सण सुरू झाल्याने लासलगावला सलग दहा दिवस कांद्याचे लिलाव बंद होते. सुटीनंतर लिलाव पूर्ववत सुरू होताच कांद्याच्या भावात साडेसातशे रुपयांची मोठी वाढ झाल्याने काही अंशी तरी शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. येथील बाजार समितीत सकाळच्या सत्रात 500 वाहनांतून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमाल 3100 रुपये, किमान 1000 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला कमाल 2350 रुपये, किमान 600 रुपये, तर सरासरी 1860 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

दहा दिवसांपूर्वीचे भाव असे…
कमीत कमी – 600 रु.
जास्तीत जास्त – 2350 रु.
सरासरी – 1860 रु.
आजचे भाव असे…
कमीत कमी – 1011 रु.
जास्तीत जास्त – 3100 रु.
सरासरी – 2400 रु. प्रतिक्विंटल

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात कांदादरात उसळी; शेतकर्‍यांत समाधान appeared first on पुढारी.