नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट

बालक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. तरीदेखील अद्याप जवळपास १९२ बालके तीव्र गंभीर श्रेणीत आहे. जानेवारी २०२२ मध्ये याच श्रेणीत २०८ बालके होती. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांतील मंजूर अंगणवाड्यांमधील मुलांचे वजन दरमहा घेण्यात येते. गेल्या एक वर्षात तीव्र गंभीर श्रेणीमधून बालके मध्यम गंभीरमध्ये दाखल झाली आहेत. वेळोवेळी लक्ष देऊन करण्यात येत असलेल्या उपचाराने ही घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्यम गंभीर कुपोषित बालकांच्या संख्येत २०० ने घट झाल्याचे चित्र आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्यादेखील ४३७ ने घटल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी २०२३ मध्ये केलेल्या तपासणीनुसार, जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमधील एकूण ५ हजार २८५ अंगणवाड्यांमधील ० ते ५ वयाच्या एकूण ३ लाख ३७ हजार ४५७ बालकांची वजने घेण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण बालकांची संख्या २ लाख ९५ हजार ४३०, तर त्यांचे प्रमाण ९१ टक्के इतके आहे. मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २३ हजार १७५, तर त्यांचे प्रमाण ७ टक्के इतके आहे. तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या पाच हजार ८४३, तर त्यांचे प्रमाण २ टक्के इतके आहे. मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या एक हजार ६८२, तर हे प्रमाण अर्धा टक्का इतके आहे. तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या १९२ असून, याचे प्रमाण ०.०६ टक्के इतके आहे. त्याचप्रकारे, जानेवारी २०२२ मध्ये केलेल्या तपासणीनुसार, जिल्ह्यातील २६ प्रकल्पांमधील एकूण ५ हजार २८६ अंगणवाड्यांमधील ० ते ५ वयाच्या एकूण तीन लाख ३७ हजार १५२ बालकांची वजने घेण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधारण बालकांची संख्या दोन लाख ९६ हजार ६७३, तर त्यांचे प्रमाण ९० टक्के इतके होते. मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २५ हजार ३०७, तर त्यांचे प्रमाण ७.७१ टक्के इतके होते. तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या सहा हजार २८०, तर त्यांचे प्रमाण १.९१ टक्के इतके होते. मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या एक हजार ८७२, तर हे प्रमाण अर्धा टक्का इतके होते. तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०८ इतकी असून, याचे प्रमाण ०.०६ टक्के इतके आहे. जिल्ह्यामध्ये अतिगंभीर श्रेणीतील बालकांना बालोपचार केंद्रात दाखल करण्यात येते. जिल्ह्यात पेठ, इगतपुरी, मालेगाव आणि त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी ही केंद्रे आहेत. या ठिकाणी मुलांना आहारसंहिता व औषधसंहिता देऊन कुपोषणातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात १४ दिवसांसाठी दाखल केले जाते. जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या या कक्षामध्ये बालकांना योग्य तो आहार आणि औषधोपचार दिले जातात. तसेच मुलांसोबत असलेल्या पालकांना बुडीत मजुरीदेखील देण्यात येत आहे. 

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात घट appeared first on पुढारी.