नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क

कोरोना विषाणू

नाशिक : पुढारी वृत्तसेवाजिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यांना जेएन-१ या नवीन व्हेरियरंटची बाधा झाली की नाही याचा अहवाल प्रलंबित आहे. कोरोनाबाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२६) सिन्नर तालुक्यातील दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोघांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्क्रीनिंग सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. तसेच, कोरोनासदृश रुग्ण आढळून आल्यास तत्काळ त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची स्क्रीनिंग करण्याचेही आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील महिलेची प्रसूतीनंतर चाचणी केल्यानंतर ती कोरोबाधित आढळून आली. त्यामुळे महिलेस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महिलेचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल कोरोनाबाधित आला. मात्र, तिला जेएन-१ कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाली की नाही याचा अहवाल प्रलंबित आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सिन्नर तालुक्यातील दोन कोरोनासदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह असून, आरटीपीसीआरचा अहवाल प्रलंबित आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

तालुकानिहाय स्क्रीनिंग

कोरोना प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार तपासणी सुरू झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांच्या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या सेंटरवर तज्ज्ञ फिजिशियनामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सेंटरवर येणाऱ्यांसोबतच कोरोनाबाधित किंवा संशयितांच्या संपर्कातील २० जणांची तपासणी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी रॅपिड टेस्ट किट पुरविले आहेत. चाचणीत कोरोनाबाधित किंवा संशयित आढळून आल्यास त्याच्यावर तालुकास्तरावरच उपचार शक्य होणार आहे.

कोरोनाची लक्षणे

– सर्दी, खोकला, ताप, थंडी अशी लक्षणे आहेत. यातून रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास उद‌्भवतो. परंतु त्यातून वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण तत्काळ बरा होतो.

जिल्ह्यात कोरोना जेएन-१ या नवीन व्हेरियंटचा एकही रुग्ण अद्याप निष्पन्न झालेला नाही. एक महिला कोरोनाबाधित असून, तिची प्रकृती स्थिर आहे. दोघांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहेत. तालुकानिहाय स्क्रीनिंग सुरू केली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. कोरोनाचा संसर्गाची शक्यता लक्षणीय असली तरी तरी मृत्यूदर कमी राहील. – डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.