नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या

नाशिक शेतकरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात खरिपाच्या 65.46 टक्के पेरण्या झाल्या असून, शेतकर्‍यांनी मका पेरणीत आघाडी घेतली आहे. मक्याची या आठवड्यात दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 90 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षभर सोयाबीनचे दर तेजीत राहिल्याने सोयाबीनची 140 टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, भाताची लागवड रखडल्याने आतापर्यंतकेवळ पाच टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 6 लाख 65 हजार हेक्टर आहे. यापैकी मक्याचे सर्वाधिक दोन लाख 32 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यानंतर बाजरी, सोयाबीन, भात या तीन पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र अनुक्रमे 1,17,504, 61, 449 व 78,613 हेक्टर आहे. याशिवाय खरिपात जिल्ह्यात नागली, ज्वारी ही अन्नधान्य पिके, तूर, मूग, उडीद ही डाळवर्गीय व भुईमूग, तीळ, खुरासणी आदी तेलबियांची पेरणी केली जाते. या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र कमी असूनही शेतकरी ही पिके घेत नसल्याचे दिसत आहे. तेलबियांचे सर्वसाधारण क्षेत्र 94,772 हेक्टर असून, त्यात एकट्या सोयाबीनची 86,270 हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन वगळता इतर तेलबियांची केवळ 17 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबियांची आतापर्यंतची पेरणी एक लाख 3 हजार हेक्टर झाली असली, तरी त्यात सोयाबीनचा वाटा अधिक आहे. डाळवर्गीय पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 84,690 हेक्टर असले, तरी आतापर्यंत केवळ 23,076 म्हणजे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

बाजरीचे क्षेत्र घटण्याची शक्यता
अन्नधान्य पिकांमध्ये बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 17 हजार 504 हेक्टर असले, तर आतापर्यंत केवळ 60,556 हेक्टरवर म्हणजे 51 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही बाजरीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता असून, त्या क्षेत्रावर शेतकरी सोयाबीन व मक्याला प्राधान्य देत आहेत.

कपाशीची 89 टक्के पेरणी पूर्ण
जिल्ह्यात मालेगाव, बागलाण, नांदगाव, निफाड, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये कपाशी घेतली जाते. जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र 40,322 हेक्टर असून, त्यावर आतापर्यंत 36,117 हेक्टरवर म्हणजे 89.57 टक्के पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरण्या(टक्के)
मालेगाव 93.69
बागलाण 79.35
कळवण 78.42
देवळा 74.13
नांदगाव 97.65
सुरगाणा 10.65
नाशिक 20.04

त्र्यंबक 2.62
दिंडोरी 19.63
इगतपुरी 5.14
पेठ 7.82
निफाड 63.1
सिन्नर 78.48
येवला 89.29
चांदवड 57.88

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या appeared first on पुढारी.