नाशिक : जिल्ह्यात चोरट्यांनी चोरली ४.७२ कोटींची वीज

महावितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात वीजचोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट याकाळात वीजचोरांच्या १ हजार २१५ घटना उघडकीस आणताना वीजचोरी करणाऱ्यांकडून ४ कोटी ७२ लाख ६८ हजार रूपयांची दंडवसूली केली. यावेळी ८ जणांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

वीजेची वाढती मागणी आणि उत्पादन याच ताळमेळ घालताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातच वीजबिलांची वाढती थकबाकी आणि खर्च भागविणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकी वसूलीवर भर दिला आहे. तसेच वीजचोरी रोखण्यासाठी मोहिम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत महावितरणच्या पथकांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देत वीजमीटरची तपासणी सुरू केली आहे. महावितरणच्या पथकांनी दिलेल्या भेटीदरम्यान, जिल्ह्यात १०१४ कारवाया केल्या. या कारवावांमध्ये मीटर टॅपींग, मीटरचा गैरवापर तसेच त्यामध्ये फेरफार आदी प्रकार समोर आहे. संबंधित वीजग्राहकांना २ कोटी ३ लाखांचा दंड करतानाच ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर ७७ ठिकाणी ज्या उद्देशाने वीजमीटर घेतले त्यासाठीच वापर केला जात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर ग्राहकांना ४७ लाख ६० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय भरारी पथकांनी मोठे ऊद्योग व आस्थापनांची पाहाणीवेळी ६६ ठिकाणी वीजचोरीचे प्रकार उघडकीस आणले. या घटनांमध्ये २ कोटी २२ लाख रूपयांची दंडवसूली महावितरणने केली आहे. महावितरणच्या या कारवायांमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

योग्य तो वापर करावा :

ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच ज्या उद्देशाने वीजमीटर कनेक्शन घेतले आहे, त्यासाठी त्याचा वापर करावा. भरारी पथकांमार्फत ठिकठिकाणी वीजमीटर कनेक्शनची तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांनी अनधिकृत वीजजोेडणी अथवा वीजचोरीचा प्रकार करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात चोरट्यांनी चोरली ४.७२ कोटींची वीज appeared first on पुढारी.