नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाने तूर्तास विश्रांती घेतली असली तरी धरणे काठोकाठ भरली असल्याने गंगापूर, दारणासह निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. चालू महिन्याच्या प्रारंभीदेखील त्याचा जोर कायम होता. त्यामुळे प्रमुख २४ धरणांतील उपयुक्त साठा ६३ हजार ९७९ दलघफूवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरण समूह असलेल्या गंगापूर समूहातील चारही प्रकल्प मिळून एकूण साठा ९ हजार ८३८ दलघफू असून, त्याचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. दारणा समूहातील सहा प्रकल्पांत १८ हजार ४३१ दलघफू म्हणजेच ९८ टक्के साठा आहे. पालखेड समूहातील तीन प्रकल्पांमध्ये ८०८९ दलघफू (९७ टक्के), तर ओझरखेड समूहात ३१६९ दलघफू (९९ टक्के) साठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहातील पाचही प्रकल्प मिळून एकूण उपयुक्त साठा २२ हजार ५६२ दलघफूवर (९८ टक्के) पोहोचला आहे. तर पुनद समूहातील दोन प्रकल्पांत ९७ टक्के साठा आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरणांमधून केला जाणारा पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामध्येच पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पर्जन्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधील विसर्गात वाढ केली जाऊ शकते.

धरणसाठा (दलघफूमध्ये) :

गंगापूर 5369, दारणा 7149, काश्यपी 1814, गाैतमी 1839, आळंदी 816, पालखेड 600, करंजवण 5187, वाघाड 2302, ओझरखेड 2130, पुणेगाव 548, तिसगाव 455, भावली 1434, मुकणे 7097, वालदेवी 1133, कडवा १६१८, भोजापूर 361, चणकापूर 2260, हरणबारी 1166, केळझर 572, नागासाक्या 397, गिरणा 18167, पुनद 1207, माणिकपुंज 322.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम appeared first on पुढारी.