नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, ‘इतके’ अद्यापही बेपत्ता

गोदावरीला पूर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात नद्या-नाल्यांना आलेल्या पुरात 10 व्यक्ती वाहून गेल्या. त्यापैकी आठ जणांचा शोध लागला असून, ते मृत झाले आहेत, तर दोेघे अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सहा मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत घोषित केली असून, दोन प्रकरणांत ही मदत नाकारण्यात आली आहे.

गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने त्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. याच पुराच्या पाण्यात 10 व्यक्ती वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्र्यंबकेश्वर व सुरगाण्यात प्रत्येकी तीन व्यक्ती वाहून गेल्या. त्या व्यतिरिक्त पेठ, दिंडोरी, नाशिक व मालेगावमधील प्रत्येक एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. दरम्यान, 10 दिवसांनंतरही पेठ व सुरगाण्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा शोध लागलेला नाही, तर अन्य आठ व्यक्तींचा शोध लागला असून, त्या मृत पावल्या आहेत.

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत प्रशासन करते. त्यानुसार आठ मृत व्यक्तींपैकी सहा जणांच्या कुटुंबांना प्रशासनाने चार लाखांची आर्थिक मदत देऊ केली आहे. परंतु, मालेगाव येथील युवकाने गिरणा नदीत पोहण्यासाठी पुलावरून उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू ओढवला, तर दुसर्‍या घटनेत अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे धरणात वीजमोटर काढण्यास गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना शासकीय नियमात बसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुरात वाहून गेलेल्या व्यक्ती
तालुका संख्या
त्र्यंबकेश्वर 03
सुरगाणा 03
पेठ 01
दिंडोरी 01
नाशिक 01
मालेगाव 01

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, 'इतके' अद्यापही बेपत्ता appeared first on पुढारी.