नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी ; वादळामुळे घरांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने हजेरी लावली. सायंकाळी अर्धा तास जोरदार सरी बरसल्यामुळे घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची दैना उडाली. मात्र, अचानक आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्यातून नागरिकांचा सुटका झाली. तर पेठ व सुरगाणा तालुक्यांना सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी व गारपिटीने झोडपून काढले. काही गावांमध्ये घरांचे नुकसान झाले.

नाशिकवरील अवकाळीचे संकट कायम आहे. त्यातच सोमवारी (दि. १०) दिवसभराच्या ढगाळ हवामानानंतर सायंकाळी 6.30 च्या सुमारास नाशिक शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास टपोरे थेंब बरसले. त्यामुळे महापालिकेने ठिकठिकाणी गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली होती. कार्यालयांमधून घराकडे परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी व सर्वसामान्यांचे हाल झाले. तसेच रस्त्यावर दुकाने थाटुन बसलेल्या छोट्या-माेठ्या विक्रेत्यांनाही या पावसाने दणका दिला. पावसाने शहराच्या काही भागांत बत्ती गूल झाल्याने महावितरणच्या गलाथान कारभाराविराेधात नाशिककरांनी संताप व्यक्त केला.

ग्रामीण भागात पेठ व सुरगाणा तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. उर्वरित तालुक्यांत उघडीप दिल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला. सुरगाणा तालुक्यात सायंकाळी ६ ला विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. डांगसौंदाणेत गारपीट झाली. तसेच तालुक्यात युवराजवाडी, खोकरी, निंबारपाडा येथील २० ते २५ घरांसोबत जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे वादळामुळे उडून गेले. तसेच पेठ तालुक्यालाही गारपिटीने तडाखा दिला. तालुक्यातील शेवखंडी, नाचलोंडी व आमलोन येथे काही घरांचे नुकसान झाले असून स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

शुक्रवारपर्यंत अवकाळीचा अंदाज

जिल्ह्यात शुक्रवार (दि. १४) पर्यंत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील. तसेच याकाळात ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात दि. 7 ते 9 एप्रिल या काळात झालेल्या पावसाने 118 घरांची अंशत: पडझड झाली तसेच 6 मोठी जनावरे दगावली असून, कांदा शेड, पॉलिहाउस, जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी ; वादळामुळे घरांचे नुकसान appeared first on पुढारी.