नाशिक : जिल्ह्यात १९८ मद्यपी चालकांना दणका; शहरासह ग्रामीण हद्दीत थर्टीफर्स्टला कारवाई

मद्यपी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरासह ग्रामीण हद्दीत थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबवली होती. त्यात शहरात ६४ व ग्रामीण भागात १३४ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना दंडात्मक कारवाईसह मद्याची नशा उतरेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहावे लागले. त्याचप्रमाणे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल, नियम मोडणाऱ्या धाबेचालकांवर, अवैध मद्यविक्री व वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई केली.

थर्टीफर्स्टच्या पार्टीच्या बहाण्याने मद्यपी मद्यसेवन करून वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघात होऊन त्यांच्यासह इतरांच्या जीवास धोका होतो. हा धोका टाळण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयासह ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात विशेष खबरदारी घेतली होती. शहरातील १३ व ग्रामीणमधील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी (दि. ३१) सायंकाळ ते रविवारपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात वाहनांसह चालकांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार शहरात एक हजार ६४३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ६४ मद्यपीचालक आढळून आले असून, १४५ इतर वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यांनी वाहनांना कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरमध्ये फेरफार व वाहनाच्या मूळ रचनेत बदल करण्यासोबतच बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ३१ वाहने जमा केली असून, त्यापैकी ५६ हजार २०० रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तर ग्रामीण पोलिसांनी स्पीड गन, ब्रेथ ॲनलायजर मशिनमार्फत वाहनांचा वेग व मद्यपी चालकांची तपासणी केली. त्यात पोलिसांनी १३४ मद्यपीचालक आढळून आले असून, त्यांना ७९ हजार १०० रुपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची धरपकड करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. पोलिसांनी अवैधरीत्या मद्यवाहतूक व विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. यात शहर पोलिसांनी ११ जणांना पकडून त्यांच्याकडून नऊ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर ग्रामीण पोलिसांनी ५३ कारवाया करून सात लाख ८४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशी झाली कारवाई
कारवाईचे स्वरूप                                शहर                            ग्रामीण
ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह                               ६४                                 १३४
अवैध मद्यविक्री व वाहतूक                    ११                                  ५३
प्रतिबंधात्मक                                      ११६                                 १८
गुन्हेगारांची धरपकड                             ०३                                 ००
वेळेचे उल्लंघन करणारे हॉटेल                ०४                                 ००

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात १९८ मद्यपी चालकांना दणका; शहरासह ग्रामीण हद्दीत थर्टीफर्स्टला कारवाई appeared first on पुढारी.