नाशिक : जिल्ह्यात 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील गावांमध्ये एकोपा वाढवण्यासोबत टिकवण्यासाठी व प्रबोधनासाठी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना रुळली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ विराजमान करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या प्रबोधनाने हा उपक्रम वाढत असून, त्यामुळे संस्कृती, एकता आणि जागरूकता गणेशोत्सवात दिसणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अनेक वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पेनंतर्गत प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे गावकर्‍यांमधील संवाद, एकोपा, संबंध दृढ होत असतात. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सवावर अनेक मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवाची जोरदार तयारी सार्वजनिक मंडळांनी सुरू केली आहे. 2019 मध्ये ग्रामीण भागात 1,300 पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे सुमारे 1,000 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली होती. यावर्षीदेखील हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी पोलिस अधीक्षक सचिन पाटील आणि अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी गावपातळीवर शांतता समितीच्या बैठका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय बैठका घेऊन त्यात 907 गावांनी एकजुटीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही काही गावे याबाबत निर्णय घेणार आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमावलीनुसार मंडळांनी कार्यवाही करावी. खबरदारी म्हणून सायबर पोलिसांतर्फे सोशल मीडियावर गस्त सुरू आहे.
– सचिन पाटील, पोलिस अधीक्षक,नाशिक

बंदोबस्ताचे नियोजन
ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्त बंदोबस्ताचे नियोजन केले असून, त्यात 1,400 पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त राहणार आहे. 1,000 होमगार्ड तैनात असतील. मंडळांना स्वयंसेवक नेमण्याचे आदेश दिले आहेत. तीन सत्रांत पोलिस, स्वयंसेवक काम करतील. महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा राहणार आहेत. मंडळांजवळ सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपळगाव, सटाणा, येवला, मनमाड, नाशिक तालुक्यात विशेष बंदोबस्त राहणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात 907 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ appeared first on पुढारी.