नाशिक : जीवितहानी होण्याआधी नवीन घरकुले बांधून द्या : समता परिषद

समता परिषद www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

येथील महात्मा फुले नगरमधील गोंडवाडी येथे जुन्या घरकुलाचे छत कोसळून तीन मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घरकुलांची अवस्था पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्यता असल्याने येथील गरीब गोंड समाजाला नवीन घरकुले बांधून देण्याची मागणी समता परिषदेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

याबाबत समता परिषदेचे नेते बाळासाहेब कर्डक, शहाराध्यक्ष कविता कर्डक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुलेनगर येथे गोंड समाजाची मोठी वसाहत असून, अत्यंत गरीब असलेल्या या समाजाची 247 कुटुंबे येथे वाल्मीकी आवास योजनेतून बांधलेल्या व अनेक वर्षे जुन्या इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत. या घरांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. कुठल्याही क्षणी घरे पडून मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. 23) येथे घराचे छत कोसळून तीन मुले जखमी झाली आहेत. तसेच भविष्यात मोठा अनर्थ होण्याचा धोका असल्याने या कुटुंबांना महापालिकेच्या हद्दीत नवीन घरकुले बांधून देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच येथे शौचालयाअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी होत असताना शहरातील मध्यवस्ती असलेल्या फुलेनगर भागात गरीब कुटुंबे वाईट स्थितीत जीवन कंठत आहेत, याकडे मनपाने लक्ष देण्याबाबत बाळासाहेब कर्डक यांनी आयुक्तांशी चर्चा केली. याप्रसंगी गोंडवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

येथे गोंड आदिवासी समाजाच्या घरकुलांची स्थिती वाईट आहे. मोठा अपघात झाल्यावर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने आधीच जागे होऊन दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळात रहिवाशांना घेऊन आंदोलन केले जाईल. – कविता कर्डक, शहाराध्यक्षा, समता परिषद.

हेही वाचा:

The post नाशिक : जीवितहानी होण्याआधी नवीन घरकुले बांधून द्या : समता परिषद appeared first on पुढारी.