नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ

पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने महापालिकेने एप्रिल महिन्यापासूनच पाणीकपातीचे नियाेजन केले होते. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी तुर्तास पाणी कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने मे महिन्यातही नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले. दरम्यान, मे अखेरपर्यंत पडणारी उष्णता व इतर बाबींचा अंदाज घेवून जूनमध्ये पाणी कपात अटळ असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने अतिरिक्त ३०० दशलक्ष घनफुट पाणी देण्याची तयारी दर्शविल्याने, त्याआधारे महापालिकेने २० आॅगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे.

गेल्या सोमवारी (दि.८) पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेताना शासकीय यंत्रणेला टंचाईचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याबरोबरच उष्णतेचे प्रमाण वाढणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे असल्याने, पाणी बचतीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. अशात महापालिकेने नाशिककरांवरील पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतचा प्रस्ताव देखील शासनाला सादर केला होता. मात्र, काही राजकीय पक्षांनी पाणीकपातीला विरोध दर्शविल्याने, याबाबतचा निर्णय कोणी जाहीर करावा यावरून प्रशासनातच टोलवाटोलवी सुरू झाल्याचे बघावयास मिळाले. त्यात पालकमंत्री भुसे यांनी, तुर्तास कपातीची गरज नसल्याचे स्पष्ट करताना जूनमध्ये आढावा घेवून निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले होते.

मात्र, उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता येत्या जुन महिन्यात पाणी कपात करावीच लागेल असे स्पष्ट संकेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. जून, जुलैमध्ये आठवड्यातून एक दिवस तर आॅगस्टमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला जावू शकतो, असेही पाणीपुरवठा विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गंगापूर धरण समुहातील पाण्याचा विचार करता महापालिकेने २० आॅगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन केले आहे. अर्थात त्याकरिता पाणी कपात करावी लागणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले गेले.

दारणातून अतिरिक्त १०० दलघफू पाणी

नाशिककरांवरील पाणीबाणी लक्षात घेता महापालिकेने गंगापूर धरण समुहातून अतिरिक्त २०० दशलक्ष घनफूट पाण्याच्या मागणीचे पत्र जलसंपदा विभागाला पाठविले होते. जलसंपदा विभागाने देखील त्यास मंजूरी दिली होती. आता महापालिकेने आणखी दारणा धरण समुहातून १०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली असून, त्यास देखील जलसंपदा विभागाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जूनमध्ये शहरात पाणीकपात अटळ appeared first on पुढारी.