Site icon

नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप व्यक्त हो असून याविषयी महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नाशिकरोड येथील महापालिकेच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शिवा ताकाटे यांनी दिला आहे.

जेलरोड येथील मराठानगर, एमईसीबी गोडाऊन, श्रीकाशीश्वर पार्क, मॉडेल कॉलनी, शिक्षक कॉलनी, बोराडेमळा, शिवाजीनगर, केरू पाटीलनगर, राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसर आदी विविध ठिकाणी दररोज कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. यामुळे महिलांना घरगुती कामासाठी पाण्याचा तुटवडा भासत आहे. महापालिका प्रशासनाला कळवून देखील अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही, दिवसेंदिवस कमी दाबाने पाणी येत असल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सध्या कुणाकडे वारंवार तक्रार करावी, असा प्रश्न त्रस्त नागरिकांना पडला आहे.

सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असून पाणीपुरवठा अधिकारी हे कार्यालयात बसून कामकाज पाहत आहे. प्रत्यक्षात पाणीटंचाई असलेल्या भागात ते फिरकत नाही, त्यामुळे त्यांना समस्यांची जाणीव होत नाही, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या भागात फिरून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्याची कारवाई करावी, अन्यथा शिवसेना बाळासाहेबांच्या या पक्षातर्फे आम्ही नाशिकरोडच्या महापालिका कार्यालयात महिलांचा हंडा मोर्चा काढून आंदोलन छेडू. – शिवा ताकाटे, शिवसेना.

हेही वाचा:

The post नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Exit mobile version