नाशिक : जोरणच्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

दिंडोरी जोरण गाव www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी)  : पुढारी वृत्तसेवा

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील जोरण येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतील पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जोरण येथील ग्रामस्थांना मुख्य व्यवसाय शेती असून, बहुतांश शेतकरी कुटुंबे असून, शेतातच वस्ती करून राहतात. मळ्यांमध्ये वस्ती करून राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी ही जीवघेणी कसरत करावी लागते. गावातून जाणाऱ्या या नदीवर कुठलाही पूल किंवा फरशी नसल्याने पुराच्या पाण्यातून एकमेकांच्या साह्याने दररोज नदी ओलांडावी लागते. गावातून बरचसे विद्यार्थी शिक्षणासाठी परिसरातील इतर मोठ्या गावांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. मात्र, येथील जोरण ते जुना नळवाडी रस्त्यावरील नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. सध्या तालुक्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालक दररोज आपल्या पाल्याला कडेवर किंवा खांद्यावर घेऊन नदी पार करून देतात. एखाद दिवशी पालक न येऊ शकल्यास विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. त्यामुळे शासनाने या नदीपात्रात पूल उभारण्याची मागणी जोरण येथील विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

जोरण ते नळवाडी येथे ४० ते ५० विद्यार्थ्यांना दररोज नदीपात्रातून ये-जा करावी लागते. पाण्याचा प्रवाह वाढल्यास जीव मुलांच्या जीवनाला धोका आहे. या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी अनेक वेळा केली आहे. मात्र, यश आले नाही. – अरुण कड, उपतालुका समन्वयक.

हेही वाचा:

The post नाशिक : जोरणच्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास appeared first on पुढारी.