नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात

शिंदे गट प्रवेश,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.14) नाशिक शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांसह इगतपुरीतील सरपंच परिषद आणि विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.

प्रवेश करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक मामा ठाकरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपत काळे आदींचा समावेश आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटाची नाशिक जिल्ह्यातील ताकद वाढल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. मागील महिन्यात शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. इतरही बारा आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदारांपाठोपाठ खा. गोडसे यांच्यासह राज्यातील बारा खासदारांनीही शिंदे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. काही दिवंसापूर्वी गोडसे यांनी घाटनदेवी येथून नाशिकपर्यंत जोरदार रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले होते. आता खा. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिंदे गटाचे संघटन सुरू झाले आहे.

शिंदे गटाच्या संघटनात्मक बांधणीचा प्रारंभ मागील महिन्यात इगतपुरी तालुक्यापासून झाला होता. इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. बुधवारी (दि.14) इगतपुरीचे माजी आमदार गांगड यांच्यासह नाशिक शहरातील पंचवटी विधानसभेचे माजी संपर्कप्रमुख दिलीप मोरे, शाखाप्रमुख अजित पवार, माजी उपशहरप्रमुख प्रकाश पवार, माजी शाखाप्रमुख सचिन थेटे, माजी उपविभागप्रमुख प्रमोद घोलप, अनिल पगारे, जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पिंगळे, देवळा शिवसेनेचे शहरप्रमुख देवा चव्हाण, शिवसेनेचे देवळा तालुका संघटक भाऊसाहेब चव्हाण, देवळा उपशहरप्रमुख सतीश आहेर, देवळा शहर संघटक नाजिम तांबोळी, देवळा उपशहरप्रमुख भाऊसाहेब आहेर, शिवसेना महिला आघाडीच्या कीर्ती निरगुडे, राष्ट्रवादीच्या कोमल साळवे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सुमारे 15 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संबंधितांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव, भाऊलाल तांबडे, लक्ष्मीबाई ताठे, सुजित जिरापुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात appeared first on पुढारी.