नाशिक : झटपट श्रीमंत होण्यासाठी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री

नाशिक : वन्यजीव अवयव तस्करी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील उच्चभ्रू वस्तीत बिबट्याच्या कातडीसह चिंगारा, नीलगायीच्या शिंगांच्या तस्करीचा डाव वनविभागाने उधळून लावत तिघा तस्करांना ताब्यात घेतले. या तस्करांमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह एका उच्च शिक्षित तरुणाचा समावेश आहे. झटपट श्रीमंत होण्यासह मौजमजेसाठी वन्यजीवाची थेट शिकार न करता चोरी केलेल्या वन्यजीव अवयवांच्या विक्रीचा घाट तिघा संशयितांनी घातल्याचे चौकशीत समोर आले आहे.

वनपथकाने कॉलेजरोड भागातून मुसक्या आवळलेल्या तिघा संशयितांपैकी एक फार्मसी, दुसरा बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. तर तिसर्‍याने वकिलीची पदवी घेतली असून, किरकोळ काम करतो. या तिघांपैकी एकाचे वडील वनविभागात वॉचमन म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे वन्यजीवांबाबत असलेली माहिती व इतर माध्यमातून संशयितांनी कातडीसह शिंगांची चोरी केल्याचा अंदाज आहे. गुन्ह्याचे गांभीर्य वाढल्याने वनविभागाकडून खात्यांतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच एक जण पोलिसाचा पुतण्या असल्याचे समजते.

बिबट्याची कातडी व चिंगारा, नीलगायीच्या शिंगांची प्राथमिक किंमत 20 लाख ठरविण्यात आली होती. तस्करीसाठी यूट्यूब व फेसबुकवरून तस्करांनी माहिती मिळवली होती. त्याबाबत या तिन्ही संशयितांच्या मोबाइलमध्ये संशयास्पद चॅटिंग आढळले आहे. 20 वर्षे जुनी बिबट्याची कातडी असल्याचा अंदाज वनाधिकार्‍यांनी वर्तविला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.21) तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

तस्करीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश ही धक्कादायक बाब आहे. अंधश्रध्देतून वन्यजीवांसह त्यांच्या अवयवांची खरेदी-विक्री होत आहे. वन कायद्यान्वये हे अतिशय गंभीर गुन्हे असून, नागरिकांनी अंधश्रध्देला बळी पडू नये. – विवेक भदाणे, वन परिक्षेत्र अधिकारी

विक्रीच्या ठिकाणांत वारंवार बदल
बिबट्याच्या कातडीसह चिंगारा, नीलगायीच्या शिंगांच्या विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांनी वारंवार ठिकाण बदल करत वनविभागाच्या पथकाची दिशाभूल केली. सकाळी 9.30 वाजता रचलेल्या सापळ्यात तस्कर सायंकाळी अडकले. दिवसभर तस्करांकडून महात्मानगर रस्ता, महात्मनगर मैदान, जेहान सर्कल, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, कॉलेज रोड, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक आदी परिसरात वनपथकाला फिरविले.

हेही वाचा :

The post नाशिक : झटपट श्रीमंत होण्यासाठी वन्यजीवांच्या अवयवांची विक्री appeared first on पुढारी.