नाशिक : टोइंग कारवाईविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

टोइंग ठेक्यास मुदतवाढ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात पूर्वसूचना न देता वाहनांवर टोइंग कारवाई केली जात असून, महामार्गांवर वेगमर्यादेचे फलक न लावता स्पीडगनमार्फत वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या चुकीच्या कारवाईविरोधात चालकांनी लोकअदालतीत बाब मांडावी. तसेच 8960798999 क्रमांकावर एसएमएस पाठवून गुगल लिंकद्वारे आपली तक्रार ग्राहक पंचायतीकडे द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत संस्था ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी काम करते. त्यांनी केलेल्या पाहणीत शहरामध्ये वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेल्या टोइंग कारवाईत पारदर्शकता नाही. वाहतुकीस अडथळा होत नसलेलीही वाहने टोइंग करणे, नो पार्किंगचा फलक नसताना वाहने उचलणे असे प्रकार होत असल्याचा आरोप पंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महामार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा 80 किमी प्रतितास इतकी आहे. मात्र या मार्गांवर वेगमर्यादा दर्शवणारे फलक नाही किंवा जे फलक आहे ते चुकीचे वेग दर्शवतात. त्याचप्रमाणे स्पीडगनमार्फत कारवाई करताना यंत्रणनेने 500 मीटर सुरुवातीस वेगमर्यादेचा फलक लावणे अपेक्षित असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. वेगमर्यादेचे फलक नसल्याने चालकांना नाहक दंड भरावा लागत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. यासंदर्भात पंचायतीमार्फत पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांना निवेदन देत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ज्या चालकांना अन्याय झाल्याचे वाटत असल्यास त्यांनी लोकअदालतीत या बाबी मांडाव्यात किंवा ग्राहक पंचायतीकडे तक्रार कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत नाशिकचे जिल्हा संघटक रवींद्र अमृतकर, सचिव हि. रा. जाधव, सहसचिव अ‍ॅड. दिनेश रणदिवे आदींनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : टोइंग कारवाईविरोधात तक्रार करण्याचे आवाहन appeared first on पुढारी.