नाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या

फ्री स्टाईल,www.pudhari.news

नाशिक, पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे बुधवारी (दि. 14) सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून महिला टोल कर्मचारी अन् पोलिसपत्नी यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेली मध्यस्थी आणि पोलिसपत्नीच्या माफीनाम्यानंतर वादावर पडदा पडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपली पत्नी व दोन मुलांसमवेत पुणे येथे जात असताना बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे आपले शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली होती. टोल नाका येथील महिला कर्मचार्‍यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल, कार्ड चालणार नाही, असे स्पष्ट केले. या पोलिस कर्मचार्‍याने पैसे देऊन टोल भरल्यानंतर वाहनात बसलेली पोलिसपत्नी आणि महिला टोल कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही महिलांमध्ये टोल नाका येथेच तुंबळ हाणामारी झाली.

काही वेळानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर टोल कर्मचारी यांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिस प्रशासनाने दोन्ही तक्रारदारांच्या बाजू ऐकून घेतल्यावर परस्पर वाद मिटवत सबुरीचा सल्ला दिला. टोल कर्मचारी यांच्या सयुक्तिक मागणीनंतर माफीनामा लिहून घेत वादावर पडदा टाकण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या appeared first on पुढारी.